ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुण्यात गारवा वाढण्याचा अंदाज
पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभावामुळे राज्यासह पुण्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारपर्यंत सूर्याची किरणे जमिनीवर पोचत नव्हती. त्याचा थेट परिणाम पुण्यातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअस कमी होऊन ३०.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला. रात्रीच्या तापमानातही ५.८ अंश सेल्सिअसने वाढ झाली. किमान तापमान १७.२ सेल्सिअस नोंदले गेले. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आकाश निरभ्र होणार असल्याने शहरात रात्री पुन्हा गारवा वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ हवामान आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ ते ८ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने गारठा कमी झाला. राज्यात सर्वांत कमी तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवस संपूर्ण हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात बुधवारी सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली. शुक्रवारपर्यंत (ता. १४) ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहणार आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

विदर्भात पावसाने हजेरी लावल्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामान झाले. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावादेखील झाला. मात्र, याचवेळी विदर्भात गारठा वाढला. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात मोठी वाढ झाली. बुधवारी (ता. १२) सकाळी पुणे, नगर, मालेगाव, नाशिक, डहाणू, सांताक्रूझ, औरंगाबाद येथील तापमानात सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढ झाली. विदर्भातही तापमानात वाढ झाली असली, तरी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली नोंदला गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloudy weather caused the boom