International Yoga Day 2019 : मुख्यमंत्री रमले योगात; रामदेवबाबांनी घडविले योगदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

योग शिबिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल दोन तास रमले. त्यांनी थेट रामदेवबाबा समवेत व्यासपीठावर योगासने केली आणि नांदेडकरांची वाहवा मिळविली.

नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्य शासन व पतंजली योग पीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योग शिबिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल दोन तास रमले. त्यांनी थेट रामदेवबाबा समवेत व्यासपीठावर योगासने केली आणि नांदेडकरांची वाहवा मिळविली.

योगदिनानिमित्त शहरालगतच्या असर्जन परिसरातील मैदानावर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तयारीसाठी कमी कालावधी मिळूनही खूप शिस्तबद्ध पद्धतीने प्रशासन, पतंजलीचे कार्यकर्ते, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करून दाखविले. तब्बल सव्वा लाखांवर साधकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.

स्वामी रामदेवांनी स्वत: आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करत योगाचे महत्व सांगत साधकांकडून योगाची विविध आसने करवून घेतली. तसेच आपल्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगप्रसाराबद्दल जगभर केलेल्या कार्याचा गौरव केला. सोबतच महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा संयमी, विनयशील व पराक्रमी मुख्यमंत्री मिळाल्याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे अशोक चव्हाणांचा पराभव करून निवडून आलेले नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या 'प्रतापा' चाही वारंवार उल्लेख केला.
योगाचे महत्व सांगत केलेल्या या राजकीय साखरपेरणीच्या निवेदनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

प्रारंभी मुख्यमंत्री व रामदेवांनी या शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रत्यक्ष योगशिबिरास प्रारंभ झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis and Ramdevbaba celebrates Yoda Day at Nanded