Vidhan Sabha 2019 : पवार खोटे बोलत आहेत, निवडणुकीनंतर खुलासा करेन : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

मी कधीही शरद पवारांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. ते खोटे बोलत आहेत. काही फोन मला आले, त्याबद्दल मी सांगितले तर राष्ट्रवादी शिल्लक राहणार नाही. याबाबत मी योग्यवेळी सांगेन. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी अर्ध्या जागाही मिळणार नाही.

मुंबई : सत्तेचा वापर करून मक्ता तयार करणे हे त्यांचे राजकारण होते. त्यामुळे आता ते चालत नाही. शरद पवारांचे राजकारण या पिढीला मंजूर नाही. मोदीजी जे करतात ते या पिढीला हवे आहे. मी कधीही शरद पवारांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. ते खोटे बोलत आहेत. काही फोन मला आले, त्याबद्दल मी सांगितले तर राष्ट्रवादी शिल्लक राहणार नाही. याबाबत मी योग्यवेळी सांगेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांना आणखी धक्के बसतील, तसेच त्यांना पराभव समोर दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, की यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी अर्ध्या जागाही मिळणार नाही. लोकांना विकास हवा आहेत. पवारसाहेबांनी किती फोडाफोडीचे कारण केले हे त्यांनी पाहावे. कालचक्र हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर देते. लोक आता आमच्याकडे येत आहेत, ते त्याला फोडाफोडीचे राजकारण म्हणत आहेत. त्यांचा पक्ष मोकळा व्हायला निघाला होता. पण, आम्ही सगळ्यांना घेतले नाही. आमच्या पद्धतीने राहू शकतात अशांनाच पक्षात घेतले. बाकींना आम्ही हात जोडले. चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून 75 टक्के मते मिळतील असा मला विश्वास आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis attacks NCP chief Sharad Pawar