CM Eknath Shinde News: CM शिंदेंनी मागवलेत तीन जाडजूड बांबू; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा, काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde News

CM Eknath Shinde News: CM शिंदेंनी मागवलेत तीन जाडजूड बांबू; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा, काय आहे कारण?

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजप नेत्याकडून तीन जाडजूड बांबू मागवले आहेत. त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आमदार फोडण्यापासून थेट शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंनी ताब्यात घेतली. इतकेच नव्हे तर राजकीय 'फटकेबाजी' करताना दिसत आहेत. अशातच तीन जाडजूड बांबू मागवल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत. (CM Eknath Shinde has ordered three bamboos maharashtra politics)

मुख्यमंत्री कार्यालायत रंगली चर्चा

शिंदेंनी जाड, मजबूत आणि लांबलचक तीन 'बांबू' मागवले आहेत. तेही मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांकडून... हे तीन बांबू आपल्या विरोधकांसाठी अर्थात, ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांसाठी मागवले नसावेत ना ? असा प्रश्न उपस्थित करून विरोधी नेत्यांना आता सांभाळूनच राहावे लागणार असल्याची गंमतीशीर चर्चा मुख्यमंत्री कार्यालयात रंगली आहे.

बांबू मागवण्याचे काय आहे कारण?

विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात बैठकांत रमलेल्या शिंदेच्या भेटीसाठी भाजपचे माजी आमदार पाशा पटेल आले. ते आपल्यासोबत बांबूपासून तयार केलेली एक जाडजूड बॅग, पाण्याची बाटली, मोबाईल स्टॅण्ड आणि इतर साहित्य घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आले.

बैठक संपवून शिंदे हे खास बांबूपासून बनवलेले साहित्य पाहण्यासाठी त्यांच्या खुर्चीजवळ आले. पटेल यांनी आणलेल्या साऱ्या वस्तू शिंदे यांनी पाहिल्या आणि कौतुकही केले.

मुख्यमंत्री शिंदेच्या कार्यालयात आणलेल्या वस्तु पाहण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती. यावेळी माध्यमेदेखील उपस्थित होते. बांबुची बॅग पाहताच मुख्यमंत्री शिंदेंनी, मी पाशा पटेल यांच्याकडे तीन जाड बांबू मागितले आहेत.

यावेळी त्यांनी तीन या शब्दावर जोर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.