
Eknath Shinde: मीनाताई ठाकरेंच्या स्मृतीदिनी CM शिंदेंचं ट्वीट; पोस्टरवर सेनेचा धनुष्यबाणही दिसला!
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं असून विविध कार्यक्रमातही सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्वीटच्या माध्यमातून मीनाताई ठाकरेंना अभिवादन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये शिंदे म्हणतात की, सर्व शिवसैनिकांची मायेची सावली, सर्वांची माऊली स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. यासोबत शिंदे यांनी एक पोस्टरही शेअर केलं आहे. त्यात असलेलं शिवसेनेचं पक्षचिन्ह विशेष लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या दोन अडीच महिन्यांपासून शिंदे विरुद्ध ठाकरे शिवसेना कोणाची असा वाद पेटलेला दिसत आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंनी सेनेतून बाजूला होत पक्षावर आपला दावा सांगितला. नुसता पक्षच नव्हे तर पक्षचिन्हावरही शिंदे गटाने दावा सांगितला आहे. आता शिंदेंनी शेअर केलेल्या या पोस्टरवर शिवसेनेचा धनुष्यबाण पाहून चर्चांना उधाण आलं आहे. यामागचा राजकीय अर्थ शोधण्याचे प्रयत्न आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.