मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवरायांच्या समाधीचे दर्शन

विपूल देशमुख
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

रायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. 'शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू,' असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर रायगडावर आले आहेत.

महाड येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी येथे छत्रपतींचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथील शिवाजी महाराजांच्या  सिंहासनाधीष्ठीत पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि काही वेळ त्याठिकाणी थांबून शिवरायांचे स्मरण केले. त्यानंतर रायगड संवर्धनासंदर्भातील बैठकीत ते सहभागी झाले. यावर्षी जानेवारीत शिवराज्याभिषेकदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड किल्ला आणि परिसराच्या संवर्धनासाठी पाचशे कोटी रूपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली होती. तीन वर्षांत रायगडचा कायापालट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आजच्या बैठकीत या संवर्धन प्रकल्पावर चर्चा होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM at Raigad to seek blessings of Shivaji Maharaj