esakal | पंतप्रधान मोदींनी केला फोन, अमित शहांनीसुद्धा केली चौकशी - मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान मोदींनी केला फोन, अमित शहांनीसुद्धा केली चौकशी - मुख्यमंत्री

पंतप्रधान मोदींनी केला फोन, अमित शहांनीसुद्धा केली चौकशी - मुख्यमंत्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - राज्यात शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्याआधी दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. कोकणात चिपळूणला पुराचा फटका बसला असून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल होताच त्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले. घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांनी मुख्यमंत्र्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. तसंच व्यापारी आणि नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली. ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला.

चिपळूण येथील पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 'केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल', असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यावर ओढावलेल्या संकटात केंद्राकडून मदतीसाठी चौकशी करण्यात आली आणि आवश्यक ती मदत पुरवली जात आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मला फोन केला. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही फोन केला. केंद्राकडून एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची मदत दिली जात आहे. जी काही मदत असेल ती देऊ असंही केंद्राने सांगितलं आहे. तसंच यापुढे आपल्याला ज्या योजना आखायच्या आहेत त्यासाठीही केंद्राची मदत लागणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री चिपळूणला पोहोचले. पूरग्रस्त भागाची पाहणी करून ते नुकसानीचा आढावा घेणार आहेत. चिपळूणनंतर मुख्यमंत्री ठाकरे साताऱ्यातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा संपल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील भेट देणार आहेत.

हेही वाचा: पुरावर कायमस्वरूपी उपाय शोधा, संभाजीराजेंची सरकारला विनंती

चिपळूणमधील पाणी पातळी कमी होत आहे. मात्र, शहरामध्ये चिखल साचला असून तो काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागातील नागरिकांना जेवणाची पॅकेट, सुके खाद्यपदार्थ व पाणी देण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या टीम काम करत असल्याची माहिती मंत्री उद्य सामंत यांनी शनिवारी दिली. शहारातील इलेक्ट्रिसिटी व मोबाईल टॉवर सुरू केले जात आहेत. चिपळुणातील सर्व नागरिकसुद्धा मदत कार्यामध्ये काम करत आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीची रत्नागिरी येथे बैठक घेतली गेली. सर्व्हेक्षण करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याची सूचना मंत्री उदय सामंत यांनी काल केली.

loading image
go to top