esakal | "मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाहीत"
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

"मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाहीत"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील आमदारांचे म्हणणं ऐकत नाहीत, असा आरोप गंगापूर-खुल्तबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा पदभार घेऊन पाऊणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या कालावधीत आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना महामारीसारखे संकट असो, राज्यातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, दुष्काळाचे प्रश्न, या सर्व मुद्द्यावर तुमच्यासोबत बोलायचं आहे. आमची मते मांडायची आहेत. तेव्हा कृपया आम्हाला भेट द्या, आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बांधकाम विभागात कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार होत असून या सर्वांचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते जर खोटे निघाले तर मी आमदार पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं बंब म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे विरोधकांना वेळ देत नाही, बोलू देत नाही असा आरोपही यावेळी बंब यांनी केला. पावसाळी अधिवेशनातही भाजपने हा मुद्दा मांडला. विकासकामे करायची आहेत , तसेच नैसर्गिक संकट, कोरोना सारख्या महामारीचा सामना करायचा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचे विचार, म्हणणेही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ऐकून घेतले पाहिजे, असे बंब म्हणाले.

हेही वाचा: न्यायाधिशाची हत्या की अपघात? 'तो' व्हिडिओ व्हायरल

दीड वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 19 पत्रं पाठवली आहेत. त्या पत्रांची पोच देण्यापलीकडे मुख्यमंत्री कार्यालयाने कुठलीच दखल घेतली नाही. आम्ही मांडलेले मुद्दे, केलेले आरोप खोटे असतील तर त्याचा खुलासा आपल्याकडून होणे अपेक्षित होते. मात्र तसेही घडले नाही, असी खंतही यावेळी बंब यांनी बोलून दाखवली.

loading image
go to top