भाजप-सेना-राष्ट्रवादीची युती २०१७ मध्ये ठरली होती? मुख्यमंत्री म्हणतात, ''सेनेला...''
मुंबई : गेल्या २०१७ मध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीची (NCP) युती होणार होती, असं गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. २०१७ ला नेमकं असं काय घडलं होतं, की यांना तीन पक्षांची युती करावी वाटली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
२०१७ साली तीन पक्षांच्या युतीची शिवसेनेला माहिती नव्हती. यांचं छुप्या रितीने काय चाललंय? हे आम्हाला माहिती नव्हतं. तीन पक्षाची युती आम्हाला तरी सांगितली नव्हती. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजप-सेनेच्या युतीत झाली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पर्याय आलेला नव्हता. २०१७ ला असं नेमकं असं काय घडलं होतं? की यांना युती करावी वाटली. कारण त्यावेळी महापालिकेच्या निवडणुका होत्या. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती तुटली होती. मग तीन पक्षांच्या युतीची चर्चा येते कुठून? असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राज्यात सध्या तरी तीन विरुद्ध एक पक्ष असं चित्र आहे. आम्ही तिघे एकत्र आलोय याचं लोकांना आश्चर्य वाटतं. पण, आम्ही सत्तेचा अर्धा कार्यकाळ पूर्ण केला आहे. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येतं नाही, कोणाच्या मनात पाठित खंजीर खुपसण्याचा विचार येत नाही तोपर्यंत आम्ही या दोन पक्षांसोबत आहोत, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते? -
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येण्याची सगळी तयारी 2017 मध्येच झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झालं नाही, असा गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला होता.