
विरोधी पक्ष आणि जनतेच्या रेट्यामुळे निर्बंध उठवले - आशिष शेलार
मुंबई : नववर्षानिमित्ताने गुढीपाडव्याला (Gudi Padwa) निघणाऱ्या स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुका होऊ नयेत अशी सरकारची इच्छा होती; पण जनतेचा व विरोधी पक्षाचा रेटा वाढल्याने अखेर निर्बंध उठवण्याचा (covid curbs) निर्णय सरकारला (Maharashtra government) घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. विधानसभा सुरू असताना मी स्वत: त्याबाबत सभागृहात मागणी केली. त्या वेळी मात्र काही जाहीर करण्यात आले नाही. त्यानंतर जनतेचा रेटा वाढू लागला तेव्हा रोष अंगावर येऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आज हा निर्णय घेतला.
हेही वाचा: मेट्रोचे जाळे उभारल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार - एकनाथ शिंदे
यासाठी एवढा उशीर का झाला? यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय का घेतला नाही? गुढीपाडवा दोन दिवसांवर आला असताना निर्णय का घेतला? याची परवानगी दिल्लीतून कुठल्या पक्ष कार्यालयातून येणार होती का? असे प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केले आहेत. हिंदू नववर्ष स्वागतयात्रा होऊ नये असेच प्रयत्न केले जात होते. मुंबईवर दहशतवादी हल्ले ड्रोनच्या माध्यमातून होणार, अशी भीती घालून जमावबंदी लावण्यात आली होती.
सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास कोणताही विरोध असण्याचे कारण नाही; पण हिंदू सणांवर निर्बंध घालण्याचे षड्यंत्र होते. आम्ही ते उघड केले. त्यामुळे जनतेचा रेटा वाढला म्हणून निर्बंध उठवावे लागले, असेही शेलार यांनी म्हटले आहे. मास्कबंदी उठवली तर तो निर्णय वैद्यकीय अभ्यास गटाच्या सूचनेनुसार होणे अपेक्षित आहे. मास्कबंदीच्या नावाने नाक्यानाक्यावर जी बेहिशेबी वसुली सुरू होती त्याचे काय, असा सवालही त्यांनी केला.
Web Title: Maharashtra Government Lifts Covid Curbs Because Of People Demand And Opposition Party Says Bjp Mla Ashish Shelar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..