राज्यात थंडीची लाट कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्‍यता

मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्‍यता
पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम आहे. रविवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी (4.9 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार (ता.11) ते बुधवार (ता.13) दरम्यान पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. यामुळे आगामी दिवसांत थंडी कमी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राज्यात रविवारही गारठा जाणवत होता. विदर्भाच्या काही भागांत कडाक्‍याच्या थंडीची लाट अद्यापही कायम आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातदेखील दिवसभर गारठा जाणवला. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट झाल्याचे निदर्शनास आले. पुण्यासह नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, ब्रह्मपुरी, नागपूर येथे 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदविले गेले. पुण्यातही येत्या दोन ते तीन दिवस आकाश दुपारनंतर अंशत: ढगाळ राहील, असेही हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील काही प्रमुख शहरांमधील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) -
पुणे-6.2, नगर-4.9, महाबळेश्‍वर-12.2, नाशिक-5.0, सातारा-9.4, मुंबई-16.8, औरंगाबाद-8.4, परभणी आणि बीड-8.5, नागपूर-6.3, वर्धा-10.1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold Increase in State