विविध अभ्यासक्रमांचे जागावाटप नव्याने होणार
मुंबई - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवतानाच शैक्षणिक आरक्षण 12 टक्के ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी, अकरावी, आयटीआय आदी अभ्यासक्रमांसाठी नव्याने जागावाटप करावे लागणार आहे. त्यातच राज्य सरकार 16 टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याने प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, वास्तुशास्त्र आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया तांत्रिक कारणामुळे रद्द करावी लागली होती. ही प्रक्रिया नव्याने राबवावी लागल्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक बिघडले आहे. सीईटी कक्षाकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु नवीन महाविद्यालये आणि तुकड्या वाढल्यामुळे जागांचे गणित अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच आरक्षणात बदल झाल्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी नव्याने "सीट मॅट्रिक्स' तयार करावे लागणार आहे.
अकरावी, आयटीआय, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या आरक्षणातही बदल करावा लागणार आहे. प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येत असल्याने सॉफ्टवेअरमध्येही बदल करावे लागणार आहेत.
सोळाऐवजी 12 टक्के आरक्षणाने गोंधळ
यापूर्वी सर्वच यंत्रणांनी प्रवेशामध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या; परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शैक्षणिक क्षेत्रात 12 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. जागावाटपाचे नव्याने "सीट मॅट्रिक्स' करण्यात येत असताना आता विविध यंत्रणांचे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. राज्य सरकार 16 टक्के आरक्षण ठेवण्याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याने प्रवेशप्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणा गोंधळात पडल्या आहेत. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
|