
Court: 'तुझी फिगर खूप...', ऑफिसमध्ये महिलेची स्तुती करणाऱ्या बॉसला न्यायालयाने सुनावलं
ऑफिसमध्ये महिलेच्या फिगरची स्तुती करणे लैंगिक शोषणच असा निर्णय मुंबईतील एका सत्र न्यायालयाने दिला आहे. एका प्रकरणात दोन आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. (Complimenting a woman figure in office is sexual harassment Court)
ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याला तिची फिगर चांगली आहे आणि डेटवर येतेस का असे या आरोपींनी विचारले होते. यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईतील एका रिअल इस्टेट कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर आणि सेल्स मॅनेजरवर त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. याची तक्रार या महिलेने कार्यालयातदेखील केली आहे. यामुळे या दोघांनी अटकपूर्व जामीन मागण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती.
लैंगिक छळाचा हा गुन्हा महिलेने 24 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात नोंदवला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक छळ आणि महिलेचा विनयभंग करणे, महिलेचा पाठलाग करणे, अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सरकारी वकिलांनी 1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती न्यायालयासमोर ठेवली होती.
मॅडम, तुम्ही स्वत:ला खूप चांगले मेन्टेन ठेवले आहे. तुझी फिगर खूप छान आहे. माझ्याबरोबर बाहेर जाण्याचा विचार केला आहे की नाही? असे आरोपी तिला म्हणत असे. यावर आरोपींनी आपण असे काही कृत्य केलेच नसल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्याला खोट्या प्रकरणात गोवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
न्यायालय का म्हणाले?
याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, सेल्स व्यवस्थापकाचे वडील आणि कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण गंभीर असून त्यात महिलेच्या प्रतिष्ठेचा समावेश आहे, यात शंका नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात आरोपीने लैंगिक छळासोबतच महिलेच्या प्रतिष्ठेलाही धक्का लावला आहे. कामाच्या ठिकाणी घाणेरडी आणि अश्लील भाषा वापरली आहे.