
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेत्यांसोबतच विद्यमान आमदारांना; तसेच पाचही कार्याध्यक्षांना स्थान दिले आहे. काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये लोकसभा निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि के. सी. पाडवी यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे.
मुंबई : पितृपक्ष संपताच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (सोमवार) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेत्यांसोबतच विद्यमान आमदारांना; तसेच पाचही कार्याध्यक्षांना स्थान दिले आहे. काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये लोकसभा निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि के. सी. पाडवी यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे. सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या वारसदारांनाही काँग्रेसने पुन्हा संधी दिली. मात्र, विद्यमान आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसने केली नसल्यामुळे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
आज भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी काढलेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून अर्ज दाखल केला.