
आमच्याकडे कुठला प्रस्ताव आल्यास आम्ही दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून विचार करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मुंबई : अब की बार, 220 पार', अशी गर्जना करत निवडणुकीच्या रणांगणात महाजनादेशासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला प्रत्यक्षात मात्र निसटत्या जनादेशावरच समाधान मानावे लागले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे तयार झाली असून आमच्याकडे कुठला प्रस्ताव आल्यास आम्ही दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून विचार करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा केवळ मीडियात सुरू आहे, आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. पण शिवसेनेला भाजपच्या दबावाखालून बाहेर पडावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट करतानाच जर शिवसेनेकडून कसल्याही प्रकारचा प्रस्ताव आला तर आम्ही दिल्लीला विचारून पुढे विचार करू असे त्यांनी सांगितले.
थोरात पुढे म्हणाले की, 10 अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. तसेच, आमची अपेक्षा जास्त होती. त्यानुसार आम्ही तयारी केली होती. परंतु जे यश मिळाले आहे ते अपेक्षेप्रमाणे आहे. तसेच, आगामी पाच वर्षे राज्यात एक जबाबदार विरोधीपक्ष म्हणून भूमिका पार पाडू असेही त्यांनी म्हटले आहे.
एक्झिट पोलविषयी बोलताना थोरात म्हणाले की, ज्या प्रसारमाध्यमांनी चुकीचा पोल दाखवला त्यांनी ज्यांना काम दिलं आहे त्यांना बदलायला हवं, त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण होत आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागितली पाहिजे असेही थोरात यांनी यावेळी म्हटले आहे.