राजधानी मुंबई : प्रतीक्षा न्याययात्रेची, धास्ती गळतीची

राहुल गांधी पोहोचतील तिथले कॉँग्रेसचे नेते पळवायचा भाजपने जणू चंग बांधला आहे.
BJP Vs Congress
BJP Vs Congressesakal

राहुल गांधी पोहोचतील तिथले कॉँग्रेसचे नेते पळवायचा भाजपने जणू चंग बांधला आहे. त्यामुळेच त्यांची यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर काही गळती होणार नाही ना, या भीतीने कॉँग्रेसनेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या घोडदौडीला रोखण्यासाठी महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ (मविआ) सर्वतोपरीने प्रयत्न करतेय! या आघाडीतील मुख्य पक्ष आहे कॉँग्रेस. या कॉँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीच्या तारखांपेक्षाही सध्या महत्त्वाची ठरते आहे, ती महाराष्ट्रात दाखल होणारी राहुल गांधी यांची न्याययात्रा. राहुल गांधी पोहोचतील तिथले कॉँग्रेस नेते पळवायचा भाजपने जणू चंग बांधला आहे. यात्रा गुजरातेत पोहोचण्यापूर्वी अर्जुन मोढवाडीया हे जुने प्रदेशाध्यक्ष तर अंबादास डेर हे नवे कार्याध्यक्ष भाजपवासी झाले.

मध्यप्रदेशात पोहोचण्यापूर्वी गांधीघराण्याशी एकनिष्ठ असलेल्या सुरेश पचौरींनी ‘जय भाजप’चा नारा दिला. आता दोन दिवसांनी राहुल गांधी महाराष्ट्रात येतील, तेव्हा कोण जाणार किंवा कोणकोण जाणार या शंकेने कॉँग्रेसच्या श्रेष्ठींना पछाडले आहे. सगळेच परस्परांवर लक्ष ठेवून आहेत. जागावाटपामुळे होणारी नाराजी निदान १७ मार्चला होणाऱ्या ‘न्याययात्रे’च्या समारोप सभेपर्यंत टाळा, अशा सक्त सूचना दिल्या गेल्या आहेत, असेही सांगतात.

महाराष्ट्रातले `मविआ’चे जागावाटप राहुल गांधी मुंबई सोडेपर्यंत होणार नाही, असे पक्षातले बडे नेते छातीठोकपणे खासगीत सांगतात. काही दगाफटका होऊ नये, यासाठी राहुल गांधी यांचे विश्वासू नेते के.सी.वेणुगोपाल मुंबईत येऊन गेले. हट्ट कसे हाताळायचे ते पुढे पाहू, असा धोरणी विचार करीत त्यांनी मुख्य महानगरात न येता विमानतळाकडेच बैठक घेतली. प्राप्तिकर खात्याच्या कारवाईमुळे पक्ष आर्थिक संकटाचा सामना करतोय.

कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च यासाठी हातात खेळता पैसा नाही, असे म्हणताहेत. जो कॉँग्रेसपक्ष सोडून जाईल, त्याला दरवाजे कायमचे बंद होतील, हे ध्यानात ठेवा असा दम राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भरला आहे. खरे तर चेन्नीथला हुशार नेते; पण केवळ दोन महिन्यांत कॉँग्रेसचे विस्कटलेले घर कसे सावरणार, या विवंचनेत आहेत.

राहुल गांधी यांच्या न्याययात्रेची १७ मार्चला जी समारोप सभा होईल, तोवर निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या असतील. ती ‘इंडिया आघाडी’ची पहिली प्रचारसभाही ठरू शकेल. ‘मिनी भारत’ असलेल्या या मुंबईतून प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचे महत्त्व आगळे आहे. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या, तेव्हाची शिवाजी पार्कवरची विशाल सभा आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहे.

ममता बॅनर्जी, नितीश कुमार या परराज्यातल्या नेत्यांसह शरद पवार ,उद्धव ठाकरे अशा महाराष्ट्रातल्या नेत्यांचा सहभाग असलेली सभा भाजपला आव्हान देणाऱ्या पर्यायांचा एक बुलंद आवाज ठरली असती. पण आता ना ममता बॅनर्जी बरोबर ना नितीश कुमार.

मुंबईत झालेल्या इंडिया आघाडी बैठकीत त्या वेळी हजर नसलेले स्टालिन, अखिलेश यादव हे नेते १७ तारखेच्या सभेला आले तरी चर्चा होईल. मात्र सध्या या सभेचा खर्च, व्यवस्था कोण करणार अशा विवंचनांत नेते आहेत. अशोक चव्हाणांचे वर्तन त्याबाबत आदर्श असे. आता त्यांची कमतरता पदोपदी जाणवते आहे म्हणे!

शक्तिप्रदर्शनाची संधी

महाराष्ट्राच्या विधिमंडळातला प्रमुख पक्ष कॉँग्रेस. जागावाटप ऐरणीवर आलेले. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले त्यांचे मतदारसंघ पिंजून काढताहेत. शरद पवार त्यांच्या मायक्रो नियोजन सवयीनुसार राज्यभर गाठीभेटी घेताहेत. कॉँग्रेसचा निवडणूक घोषणेआधीचा हा महत्त्वाचा आठवडा मात्र वेगळ्याच कार्यक्रमाच्या आखणीत जातो आहे. अर्थात जे अटळ त्यात संधी शोधायची असते.

पक्षाचे सर्वात महत्त्वाचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात न्याययात्रेच्या समारोपासाठी दाखल झाले आहेत, तर त्यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन व्हायला हवे. न्याययात्रेचा समारोप मिनी भारत असलेल्या मुंबईत होतो आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा समारोप होत असल्याने यात्रेच्या शेवटाची सभा ऐतिहासिक करता येईल. इंडिया आघाडीची ही पहिली प्रचारसभा ठरू शकेल.

खरे तर राज्यातल्या कॉंग्रेससाठी ही सुवर्णसंधी आहे. मोदींच्या महायुतीला महाराष्ट्रात विकासआघाडी ताकदीने आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मैदान मारणे मोदींना खूप सोपे नाही, असे भाकित केले जाते आहे. उत्तरभारतातील मोदीमय राजकीय वास्तव दक्षिणेत पोहोचेस्तोवर, राजकीय निरीक्षकांच्या मते शक्ती गमावून बसतेय. मोदींची गतिशक्ती ‘नर्मदा’ ओलांडली की मंद होतेय का?

महाराष्ट्रात विकास आघाडी खरोखरच भाजपप्रणित महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करु शकेल काय, याचा विचार करायची गरज आहे. दोन पक्ष फोडले तरी भाजपचे महाराष्ट्रात काही खरे नाही, त्यांना विजय फार सोपा नाही, असे बहुतेक पाहाण्या सांगतात, माध्यमेही तेच म्हणतात. जागावाटपासंदर्भात शिंदे- पवारांच्या मागण्या दररोज समोर येत आहेत.

या वातावरणात राहुल गांधी यांचे नंदूरबार धुळे, नाशिक, ठाणेमार्गे मुंबईत होणारे आगमन केवळ कॉँग्रेसलाच नव्हे तर अख्ख्या आघाडीला वरदान ठरू शकते, पण . . .! या पण दरम्यानच्या शक्यतांनी कॉँग्रेसला अस्वस्थ करुन सोडले आहे. देशव्यापी न्याययात्रेची मुंबईत सांगता होईल, तेव्हा कॉँग्रेसचे किती मोहरे कामी आलेले असतील, याचा अंदाज घेत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले मग्न आहेत म्हणतात.

भ्रमण आणि संभ्रम

राहुल गांधी यात्रेतून ‘प्यार का पैगाम’ देत असताना ‘जनता के सिपाही’ असणारे कार्यकर्ते सोडून जाताहेत. ऐन निवडणुकीच्या आधीचा न्याययात्रेचा हा दुसरा अन् शेवटचा टप्पा कॉंग्रेससाठी आव्हानात्मक ठरतोय. बेरोजगारी, महागाई या मुद्यांवर सत्ताधाऱ्यांवर घणाघात करण्यापेक्षा वेगळ्याच लढाईत कॉंग्रेस पक्ष गुंतला आहे. राहुल गांधींची यात्रा जेथे जाईल, तेथे पक्षांतरमोहीम भाजपला भुललेले किंवा घाबरलेले कॉंग्रेसजन राबवताहेत.

विधायक विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज; पण ती भरुन काढण्यातही कॉँग्रेस अपयशी ठरते आहे. यात्रेचा उद्देश उत्तम; पण राज्याराज्यांतल्या संघटनेतले रुसवेफुगवे दूर करत जागावाटपात लक्ष घालण्याऐवजी राहुल गांधी नको तेव्हा भारतभ्रमण का करताहेत, हा प्रश्न कार्यकर्त्यांना अन् जनतेलाही पडतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com