मुख्यमंत्र्यांच्या रथावरून उतरून सत्तार थेट अडकले शिवबंधनात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

युतीमध्ये सिल्लोडची जागा भाजपकडे असली तरी सत्तार यांच्यासाठी हा मतदारसंघ आता शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्यानंतर अब्दुल सत्तार थेट मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोड तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (सोमवार) अखेर शिवसेनेची वाट धरत शिवबंधऩात अडकण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औरंगाबाद येथे आली असता ते स्टेजवर दिसले होते. तसेच त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चाही होत्या. पण, भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांकडून होत असलेला विरोध पाहता भाजपच्या मदतीने सत्तार शिवबंधनात अडकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. अखेर आज गणेश आगमनाचा मुहूर्त साधत सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द करत शिवसेनेत प्रवेश केला.. शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे सत्तार यांच्या सोबत आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होती. नुकत्याच झालेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सत्तार यांनी सिल्लोडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत थेट मुख्यमंत्र्यांसोबत बसमध्ये प्रवेश मिळवला होता. बसमध्ये चढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हात दिल्यामुळे सत्तार यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात होता. परंतु, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा टोकाचा विरोध आणि महाजनादेश यात्रेच्या स्वागतावरून दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्य मार्ग काढत सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाचा मार्ग खुला केल्याचे समजते.

युतीमध्ये सिल्लोडची जागा भाजपकडे असली तरी सत्तार यांच्यासाठी हा मतदारसंघ आता शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्यानंतर अब्दुल सत्तार थेट मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोड तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Abdul Sattar enters Shivsena in Mumbai