मुस्लिम लीग चालते, मग शिवसेना का नाही?

मृणालिनी नानिवडेकर
Thursday, 14 November 2019

राममंदिराचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेशी आघाडी कशी करता येईल, या काँग्रेसमधील एका गटाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केरळात मुस्लिम लीगशी केली तशीच, असे कळविले आहे.

मुंबई - राममंदिराचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेशी आघाडी कशी करता येईल, या काँग्रेसमधील एका गटाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केरळात मुस्लिम लीगशी केली तशीच, असे कळविले आहे. 

शिवसेनेने पुढे केलेला मैत्रीचा हात कशासाठी स्वीकारावा, असा प्रश्न पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केल्याचे काँग्रेस नेते सांगतात. वैचारिक धारणांना छेद देणारा हा घरोबा का करावा, हिंदुत्ववादाचे राजकारण करणाऱ्या भाजपशी काडीमोड करणारी शिवसेना आपल्या समवेत का राहील याची कारणे द्या, असे प्रश्न करत काँग्रेसश्रेष्ठींनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. 

मात्र, काँग्रेस आमदार सत्तेसाठी शिवसेनेकडे जाण्याची भूमिका सोडणार नाहीत, हे लक्षात आल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जो विचार करतील त्याचा अंदाज घेण्याचे ठरले आहे. या पक्षावरही कितपत विश्‍वास ठेवावा, अशी काँग्रेसच्या एका गटाची विचारसरणी आहे. अखेर शिवसेनेशी मैत्रीची परवानगी देण्यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला हरताळ कसा फासता येईल? अन्य राज्यांत भूमिका वेगळी असल्याचे सांगण्यात येते आहे. ‘आंध्र प्रदेशाच्या विभाजनापूर्वी एकेकाळी काँग्रेसने एमआयएमशीही हातमिळवणी केली होती.

मुस्लिम मूलतत्त्ववादी पक्ष चालतात; तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला का दूर ठेवायचे, मोदींना महाराष्ट्रात थांबवले, हा विचार पुढे जाईल,’ असे राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांनी म्हटले असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress mla talking to sonia gandhi politics