Vidhan Sabha 2019 : राहुल गांधी मंगळवारी विदर्भात; दोन सभा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

राहूल गांधी यांची पहिली सभा यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. काँग्रेसकडून 1999 पासून तीनवेळा आमदार असलेले वामनराव कासावार येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्याशी होत आहे. गेल्यावेळी त्यांनी पाच हजार मतांच्या फरकाने कासावार यांना पराभूत केले होते. 

पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा मंगळवारी (ता. 15) विदर्भात प्रचार दौरा आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हेही आजपासून राज्यात तीन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर येत आहेत. विदर्भात काँग्रेसने प्रचाराचा जोर लावला आहे. 

राहुल गांधी यांची पहिली सभा यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. काँग्रेसकडून 1999 पासून तीनवेळा आमदार असलेले वामनराव कासावार येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्याशी होत आहे. गेल्यावेळी त्यांनी पाच हजार मतांच्या फरकाने कासावार यांना पराभूत केले होते. 

वणी मतदारसंघ हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असून, राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे मंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले. त्यामुळे, गांधी यांची सभा या भागात ठेवण्यात आली आहे. 

वर्धा मतदारसंघातील आर्वी मतदारसंघात गांधी यांची दुसरी सभा दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर काळे यांची लढत येथे भाजपचे उमेदवार माजी आमदार दादाराव केचे यांच्याशी होत आहे. काळे यांच्या घराण्याचे 1990 पासून या मतदारसंघावर वर्चस्व आहे. अमर काळे व केचे यांच्यात 2004 पासून या मतदारसंघात लढत होत असून, 2009 मध्ये केचे विजयी झाले, तर 2004 आणि 2014 मध्ये काळे विजयी झाले. गेल्या दोन्ही निवडणुका अत्यंत अटीतटीच्या ठरल्या असून, विजयी उमेदवाराचे मताधिक्‍य पाच हजार मतांपेक्षा कमी आहे. त्यामुळे, या लढतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्याच्या कारणावरून विद्यापीठातून सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसने हा मुद्दा दोन दिवसांपूर्वी लावून धरला. निवडणीक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे, विद्यार्थ्यांवरील निलंबन मागे घेण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर वर्धा जिल्ह्यात गांधी याचा प्रचार दौरा आहे.वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दोन मतदारसंघ काँग्रेसकडे, तर उर्वरीत दोन भाजपकडे आहेत. 

छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या आज नागपूर शहरात तीन सभा होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांची आज रात्री सभा होणार आहे. बघेल यांच्या मंगळवारी भंडारा व अमरावती जिल्ह्यात, तर बुधवारी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात सभा होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Rahul Gandhi campaign in Maharashtra