esakal | नाना पटोलेंची कोलांटउडी; म्हणाले, पाळत केंद्राची, राज्याची नव्हे
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोलेंची कोलांटउडी; म्हणाले, पाळत केंद्राची, राज्याची नव्हे

नाना पटोलेंची कोलांटउडी; म्हणाले, पाळत केंद्राची, राज्याची नव्हे

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मुंबई - मागील काही दिवसांत बेधडक वक्तव्य करून महाविकास आघाडीवरच स्वतः संकट ओढवून घेणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. विद्यमान सरकारकडूनच त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केल्यानंतर हा आरोप राज्य सरकारवर नसून केंद्र सरकारवर केल्याचे सांगत नाना पटोलेंना लागलीच घूमजाव करावे लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीवर नाना पटोलेच आरोप करत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरपणे नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर पटोले यांनी हा आरोप राज्य सरकारवर नसून केंद्र सरकारवर केला असल्याची कोलांटउडी मारली. पटोले म्हणाले, ‘‘त्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ माध्यमांकडून लावला जात आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नसून केंद्र सरकारवर होते. माझा राज्य सरकारवर कोणताही आरोप नसून याबाबत मी लवकरच भूमिका स्पष्ट करेन.’’

आघाडीचे सरकार भक्कम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिले. मात्र पक्ष विस्तार करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे होत नसून निधीही मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते स्वतः यामध्ये लक्ष घालणार असल्याचे पटोले यांनी सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.

हेही वाचा: केंद्रीय मंत्री भागवत कराडांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

आधी माहिती घ्यावी - मलिक

नाना पटोले यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी याविषयी, नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला असल्याचा टोला हाणला. मलिक याविषयी म्हणाले, ‘‘राज्यात सरकार कुणाचेही असो राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते, मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असते. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून तो खात्यांतर्गत अहवाल करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे जमा होते. ही पद्धत नाना पटोले यांना माहीत नसेल तर, त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे.’’ तसेच, ‘‘नाना पटोले यांना त्यांच्या कार्यक्रमाला पोलिस बंदोबस्त नको असेल तर, तसा अर्ज करावा. त्याबाबतीत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील,’’ असा नवाब मलिक यांनी चिमटा काढला आहे.

हेही वाचा: शिवसेना,राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली - नाना पटोले

काय म्हणाले होते पटोले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी असल्याचे सोनिया गांधींनी सांगितले आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे.”

‘‘महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा अहवाल रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही अहवाल गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असे वक्तव्य करत नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली.

loading image