भाजपमधील दुसरी मेगा भरती 10 ऑगस्टला; कोण जाणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

आता संग्राम जगताप (नगर), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), कैलास चिकटगावकर (वैजापूर), ज्योती कलानी (उल्हासनगर), सिद्धराम म्हेत्रे (अक्कलकोट), जयकुमार गोरे (माण), अब्दुल सत्तार (सिल्लोड), भारत भालके (माळशिरस), राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद) या आमदारांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जोरदार मेगाभरती सुरु असून, बुधवारी झालेल्या मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता मेगाभरतीचा दुसरा टप्पा 10 ऑगस्टला पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपमध्ये बुधवारी झालेल्या मेगाभरतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधील एकूण 6 बड्या नेत्यांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षात घेतले. आता भाजपची महाजनादेश यात्रा आजपासून (1 ऑगस्ट) सुरू होणार आहे. यामध्ये ज्या ठिकाणी रोड शो, स्वागत कार्यक्रम, जाहीर सभा असणार आहेत. तिथे स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश होणार आहेत. या यात्रेचा पहिला टप्पा 9 ऑगस्टला संपत आहे. 31 जुलैप्रमाणे असाच एक मेगा पक्ष प्रवेश 10 ऑगस्टला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढणार असून, येत्या 10 ते 15 दिवसांत जागावाटप व त्याबाबतची बोलणी पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, महात्मा फुलेंच्या वंशज नीता होले, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांच्यासह आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर, संदीप नाईक आदींनी मुंबईतील गरवारे क्‍लब येथे झालेल्या समारंभात भाजपात प्रवेश केला होता.

आता संग्राम जगताप (नगर), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), कैलास चिकटगावकर (वैजापूर), ज्योती कलानी (उल्हासनगर), सिद्धराम म्हेत्रे (अक्कलकोट), जयकुमार गोरे (माण), अब्दुल सत्तार (सिल्लोड), भारत भालके (माळशिरस), राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद) या आमदारांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCPs some leaders may be entered in BJP