हा विजय उद्याच्या काँग्रेसचा आहे; युवक काँग्रेसचा आहे !

टीम ई सकाळ
Thursday, 24 October 2019

सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे जास्त सभा न घेताही काँग्रेसला इतक्या जागा कश्या मिळाल्या? लोकांच्या म्हणण्यानुसार प्रचारात काँग्रेसचे मोठे नेते दिसले नाहीत तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांत फार फरक दिसत नाही.

सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे जास्त सभा न घेताही काँग्रेसला इतक्या जागा कश्या मिळाल्या? लोकांच्या म्हणण्यानुसार प्रचारात काँग्रेसचे मोठे नेते दिसले नाहीत तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांत फार फरक दिसत नाही.

पण याचं श्रेय बऱ्यापैकी युवक कॉंग्रेसने केलेल्या कामाचे आहे असे म्हणावे लागेल. या यशात मोठा वाटा युवक कॉंग्रेसचा आहे असे म्हणावे लागेल. युवक काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत लवकर विधानसभा  निवडणुकीच्या तयारीस सुरवात केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या कल्पनेतुन युवक कॉंग्रेसने प्रोजेक्ट सुपर सिक्स्टीची सुरवात केली. राज्यातील साठ मतदार संघ निवडून त्यात काम करण्याचा निर्धार केला. हे मतदारसंघ मागील निवडणुकीत काँग्रेसने कमी अधिक फरकाने गमावले होते. निवडणुकीच्या सहा महिने आधीपासूनच युवक कॉंग्रेस या साठ मतदार संघात सक्रीय झाली.

युवक काँग्रेसकडून एक टीम निवडून येणाऱ्या सहा महिन्याचे नियोजन तयार केले, कोणत्या टप्यावर काय काम करायचे याचे चोख नियोजन आखले. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये प्रोजेक्ट सुपर सिक्स्टीचे ऑफिस बनवण्यात आले. प्रोजेक्ट सुपर सिक्स्टीचे काम मानस पगार या युवकाकडे देण्यात आले. या अंतर्गत पहिल्यांदा मागील पराभवाची कारणे शोधण्यात आली. या मतदारसंघात स्थानिक परिस्थिती आणि प्रश्न समजून घेऊन त्यानुसार काँग्रेस पक्षाची स्थानिक रणनीती ठरवण्यात आली होती. जिल्हा परिषद गटापासून बूथ पर्यंत युवक काँग्रेसचे समनव्यक नेमण्यात आले. प्रत्येक मतदार संघात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.

पक्षाच्या या उपक्रमाला पक्षातून ही चांगला प्रतीसाद मिळाला. नवमतदार नोंदणी झाल्यानंतर, दुसया टप्प्यात निवडलेल्या सर्व मतदारसंघात सोशल मिडिया आणि बूथ पातळीवरील व्यवस्थापनाचे ट्रेनिंग घेण्यात आले. या प्रशिक्षणाची जबाबदारी अमर जाधव व जिंदा सांडभोर या युवकांनी पार पाडली. त्यानंतर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे वाहू लागले, ज्यात कॉंग्रेस राष्ट्र्वादीच्या अनेक नेत्यांनी भाजप-सेनेची वाट धरली. कॉंग्रेस पक्षाच्याही नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केल्याने युवक कॉंग्रेसने साठ पैकी ४८ मतदार संघातच जास्त जोर लावायचे ठरवले.

मोठ्या सभा, समारंभांना, यात्रेना फाटा देत थेट जनतेशी संवांद साधण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यामुळे छोट्या सभागृह भेटींवर पक्षाने जास्त लक्ष केंद्रित केले. शेवटच्या टप्प्यात पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक घरी जाऊन गृहभेटी घेण्याचे नियोजन केले. पक्षाचा कार्यक्रम, जाहीरनाम्यातील मुद्दे थेट मतदारांच्या घरात जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. लोकांच्या मनातील सर्व प्रश्न, शंका, कुशंकांचे निरसन प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केले. या गोष्टी मुळेच सामान्य मतदारांच्या मत परिवर्तन करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. आज निकाल लागला तेव्हा युवक काँग्रेसकडे असणाऱ्या या 48 मतदार संघापैकी 26 मतदार संघात पक्षाने आज विजय नोंदवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress victory credit goes to Youth Congress super 60 plan