काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश

अमरावती : राष्ट्रवादीला बाजूला ठेवून सेनेला सोबत घेण्याच्या योजनेला तूर्तास विराम देत स्वबळाचा नारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी दिली. निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तयारीला लागण्यासही प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे. संघटन व सदस्यनोंदणीवर भर देण्याचा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे.

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष निवडीचा सर्व प्लान तयार - नाना पटोले;पाहा व्हिडिओ

महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश व शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीत ते राष्ट्रवादीला बाजूला ठेवून सेनेसोबत सख्य साधण्याचा मंत्र देणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी तयारीसुद्धा केली होती. मात्र, ऐनवेळी या विषयाला तूर्तास विराम देत प्रदेशाध्यक्षांनी पक्ष संघटन व सदस्य नोंदणीवर भर देण्याचा मंत्र दिला.

महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात नियोजित असल्या तरी त्या कोविड संक्रमणाच्या पाश्र्वभूमिवर काही काळ पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक आयोगाची भूमिका बघता निवडणुकीसाठी तयार राहण्यास प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना बजावले. कोविड संक्रमणाच्या पाश्र्वभूमिवर निवडणुका स्थगित होणार नसून त्या केव्हाही होऊ शकतात. या निवडणुकांत राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्यासोबत आघाडी करण्याचा विचार नसल्याने स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे बहुतेक इच्छुकांना उमेदवारी दिल्या जाणार आहे. त्यामुळे गाफील न राहता तयारीला लागण्याचा मंत्र देण्यात आला आहे. तयारी करताना बूथ कमिटी, सदस्य नोंदणीवर भर देण्यास सांगण्यात आले. मुंबईतील टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीस प्रदेश कार्यकारिणीतील स्थानिक पदाधिकारी, शहराध्यक्ष, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, एनएसयूआय, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress Will Separately Contest Municipal Corporation Election Says Nana Patole

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Congress
go to top