Vidhan Sabha 2019 : लातूरमध्ये भाजपच्या घोडदौडीने काँग्रेस चिंतेत 

congress, bjp
congress, bjp

विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपने मारलेली धडक चकित करणारी आहे. त्याला रोखायचे कसे याची चिंता काँग्रेस नेतृत्वासमोर आहे. गड शाबूत राखत युतीला रोखण्याच्या सज्जतेत ते आहेत, तर त्यास जमीनदोस्त करण्याची भाजपची तयारी सुरू आहे. 

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे "कमळ' उमलले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपने उमेदवार बदलून तीन लाखांचे मताधिक्‍य घेऊन वर्चस्व सिद्ध केले आहे. भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात सुरू असलेली घोडदौड आणि वाढते वर्चस्व पाहून काँग्रेसच्या नेत्यांना धडकी भरत आहे. भाजपने आता "मिशन विधानसभा' सुरू केले असून, काँग्रेसच्या नेत्यांची स्वतःचा मतदारसंघ कसा टिकवावा, यासाठी धडपड सुरू आहे. 

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मोदी लाटेत ढासळत चालला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निलंगेकर यांनी उमेदवार बदलून घेऊन तो सुमारे तीन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी करून दाखविला. सहाही विधानसभा मतदारसंघांत मोठे मताधिक्‍य मिळाले. जिल्हा भाजपमय होत असल्याने नेत्यांत आत्मविश्वास वाढला आहे. भाजपचे वाढते वर्चस्व आणि वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत लाखाच्या वर घेतलेली मते यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. 

लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांचे वर्चस्व आहे, तेच उमेदवार राहणार आहेत. भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शैलेश लाहोटी इच्छुक असले, तरी यापेक्षा आणखी कोणी तगडा उमेदवार देता येईल का, याची चाचपणी पक्षाच्या वतीने केली जात आहे. दुसरीकडे युती झाली तर ही जागा शिवसेनेला सुटेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघावरही काँग्रेसचेच वर्चस्व राहिलेय. या मतदारसंघातून आमदार ऍड. त्र्यंबक भिसे यांचा दावा आहे; पण अमित देशमुख यांचे लहान बंधू जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर हेदेखील इच्छुक आहेत. भाजपच्या वतीने रमेश कराड यांचा उमेदवारीचा दावा कायम आहे. या मतदारसंघातही भाजपकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. काँग्रेसमधील माजी आमदारासह राष्ट्रवादीचा एक नेता गळाला लागतो का, याचा प्रयत्न सुरू आहे. 

औसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांची उमेदवारी निश्‍चित आहे. येथून देशमुख गटाचे श्रीशैल्य उटगे हेही इच्छुक आहेत. हा मतदारसंघ भाजपला सुटणार की शिवसेनेला हे निश्‍चित नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांचा डोळा आहे. येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांचाच हिरवा कंदील आहे. हा मतदारसंघ भाजप सोडून घेणार हे निश्‍चित आहे. तरीदेखील शिवसेनेच्या वतीने माजी आमदार दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी हे इच्छुक आहेत. 

निलंगा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील-निलंगेकर आणि संभाजी पाटील-निलंगेकर या काका-पुतण्यातच पुन्हा लढत होण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघातून काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राहिलेले अभय साळुंके हेही इच्छुक आहेत. 
उदगीर या राखीव विधानसभा मतदारसंघात आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी निश्‍चित आहे. आघाडी झाली तर ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे, त्यामुळे तेथे पक्षाचे प्रदेश सचिव संजय बनसोडे हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांनीही पुन्हा एकदा इच्छा दर्शविली आहे. 

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून गेल्यावेळी निवडून आलेले विनायकराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अशोक केंद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार आहे, त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 
जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत भाजपचे आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन आमदार असे समसमान संख्याबळ आहे; पण गेल्या पाच वर्षांत भाजपची घोडदौड सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनेच वर्चस्व राखलेय. विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहणार आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना गड सांभाळण्यासाठी कसरत करावी लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com