Devendra Fadnavis : ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

control pornography Devendra Fadnavis cyber crime school student nagpur

Devendra Fadnavis : ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

नागपूर : ‘‘शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे लहान वयातच विकृत दृष्टिकोन तयार होतो. त्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. ही विकृती रोखण्यासाठी पोर्नोग्राफीक मजकुरावर संपूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असून यासाठी राज्यात सायबर प्रकल्प तयार करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.

‘‘मुंबईत शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत विधान परिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या लक्षवेधी प्रश्‍नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शाळेत झालेली ही येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत मिळालेल्या तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे.

लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व संकेतस्थळावरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे. राज्यात इंटरनेटवरील मजकुरावर आणि वेबसाइटवर प्रतिबंध घालण्याचे काम सुरु आहे. सायबर गुन्ह्यांबाबत सायबर गुप्तचर विभाग प्रकल्प प्रस्तावित आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.

शाळांमध्ये सीसीटीव्ही

उपमुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील काही मोठ्या शाळा, महाविद्यालयामध्ये सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटिव्ही बसविण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी टप्प्याटप्प्याने सीसीटिव्ही बसविण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देणे सुरू आहे.

प्रबोधनासाठी ‘पोलिस दीदी’

शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल. किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलिस दीदी’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती, कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली. या चर्चेत अंबादास दानवे, प्रवीण दरेकर आदींनी उपप्रश्न उपस्थित केले होते.