esakal | शालेय अभ्यासक्रमात आता सहकाराचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय अभ्यासक्रमात आता सहकाराचे धडे

शालेय अभ्यासक्रमात आता सहकाराचे धडे

sakal_logo
By
अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : समाजात सहकार क्षेत्राशी संबंध न येणारी व्यक्ती तशी दुर्मिळच. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य प्रगतशील म्हणून ओळखले जाते. सहकार क्षेत्राचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळाल्यास सहकार अधिक सक्षम होइल. त्यासाठी सहकार विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या वतीने राज्य सरकारला पुढील महिन्यात प्रस्ताव देण्यात येणार आहे.

राज्यात सहकारी कृषी, बॅंकिंग, पतसंस्था, साखर कारखाने, सूत गिरण्या, विपणन, प्रक्रिया उद्योग, गृहनिर्माण संस्था, मजूर संस्था, ग्राहक सहकारी संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा सहकार क्षेत्राशी संबंध येतो. त्यामुळे सहकारी संस्थांचे कार्य नेमके कसे चालते, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी सहकार विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक स्वरूपातही बॅंकिंगचे धडे मिळावेत, यासाठी बॅंकांच्या मदतीने शाळेतच बॅंकेचा प्रारूप तयार करण्यात येईल. विद्यार्थी त्या बॅंकेत व्यवस्थापक, कॅशिअर, लिपिकाची भूमिका बजावतील. जेणेकरून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात त्या ज्ञानाचा उपयोग करणे शक्य होणार आहे.

शालेय जीवनापासून सहकाराची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी, यासाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. सहकार विषयाची रचना सहज, सोप्या भाषेत असावी. तसेच, प्रात्यक्षिकांवर भर असावा, यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य सहकार परिषदेकडून देण्यात आली.

युती सरकारच्या कार्यकाळात सहकार विषय शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत समिती गठीत करण्यात आली होती. मात्र, सहकार परिषदेच्या माध्यमातून हे काम आता पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

शालेय अभ्यासक्रमात सहकार विषय सुरू करण्याबाबत सहकार परिषदेकडून पुढील महिन्यात राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सहकार विषय केवळ परीक्षेपुरता आणि तांत्रिक न ठेवता आत्मीयता वाढीस लागली पाहिजे. मुलांमध्ये लहानपणापासूनच सहकाराची गोडी वाढावी, यासाठी अभ्यासक्रमात सहकार क्षेत्रातील यशस्वी गाथा गोष्टींच्या रूपाने मांडण्यात येतील. विद्यार्थ्यांमध्ये सहकार बिंबवणे हा मुख्य उद्देश आहे.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सहकार परिषद

loading image
go to top