शिवसेनेमुळे अडले समन्वय समितीचे घोडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 जानेवारी 2020

आघाडीच्या करारावर तिन्ही पक्षांच्या सह्या
महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमावरच सरकार स्थापन केले असून, या करारावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे केवळ शिवसेनेलाच सही करायला लावली, हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा दावा चुकीचा असल्याचा टोला ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी लगावला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत काँग्रेसने युती केली. मात्र, त्यासाठी संविधानाच्या चौकटीतच सरकार चालविण्याची अट घातली होती, असे वक्‍तव्य चव्हाण यांनी केले होते. त्यावरून खळबळ उडाली होती. चव्हाण यांच्या वक्‍तव्याबाबत नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्‍त केली. सर्व सरकारे संविधानावरच चालतात. त्याचप्रमाणे हे सरकारदेखील संविधानाच्या चौकटीतच काम करीत असल्याचे मलिक म्हणाले.

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समन्वय समितीचे घोडे शिवसेनेमुळे अडले असल्याचे सांगितले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा कारभार सुरळीत चालण्याच्या उद्देशाने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय हे सरकार स्थापन करण्यापूर्वी झालेल्या बैठकांत झाला होता. मात्र, अद्याप ही समिती स्थापन होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, काँग्रेस पक्षातर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. मात्र, शिवसेनेकडून कोणाचीही नावे निश्‍चित करण्यात आलेली नाहीत. शिवसेनेकडून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उदयोगमंत्री सुभाष देसाई तसेच परिवहनमंत्री अनिल परब या तीन नावांची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coordination committee problem by shivsena