esakal | कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासनाकडून मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासनाकडून मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर

कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील 28 हजार मुले अनाथ झाली आहेत. दुसरीकडे बालमजुरी, शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे केल्यानंतर त्यात 25 हजार मुले आढळली.

कोरोनामुळे 28 हजार मुले अनाथ! शासन मदत नाहीच; अनाथ बनले बालमजूर

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटेत राज्यातील 28 हजार मुले अनाथ (Orphans) झाली आहेत. दुसरीकडे बालमजुरी, शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे केल्यानंतर त्यात 25 हजार मुले आढळली. त्यांना शाळांमध्ये (School) नुसताच प्रवेश दिला, परंतु ते शिक्षणापासून दूर असतानाही त्यांच्याकडे लक्ष दिले जात नसल्याची वास्तविकता समोर आली आहे. ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) आग्रह धरलेला असतानाही मुलांना पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांना आर्थिक हातभार द्यावा, कोरोनामुक्‍त गावांमध्ये नियमांचे पालन करून ऑफलाइन शिक्षण द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: वैरागच्या 'या' मोर्चामुळे संमत झाला 'रोहयो' कायदा

कोरोनामुळे दोन-तीन मुली असलेल्या घरातील पालक गेल्याने त्या मुलींच्या भविष्याची चिंता आहे. राज्यातील अनाथांच्या मदतीची घोषणा करूनही शासनाकडून काहीच लाभ मिळालेला नाही. शिष्यवृत्ती परीक्षा होऊनही लाभ मिळाला नाही, उपस्थिती भत्तादेखील मिळालेला नाही. "शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू' या उपक्रमाअंतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच असून केवळ 40 ते 45 टक्‍के मुलेच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. उर्वरित मुले मोबाईल नसल्याने, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणापासून दूर आहेत. गृहभेटी, पारावरची शाळा आता बंद झाल्याने पूर्वी मजुरी करणारी मुले पुन्हा त्या ठिकाणी दिसू लागल्याचे चित्र आहे. ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे धाडस सद्य:स्थितीत कोणीच करायला तयार नाही. मात्र, ज्या गावांमध्ये ऍन्ड्रॉईड मोबाईल नसलेले सर्वाधिक विद्यार्थी आहेत अथवा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी काहीच उपाययोजना करायला देखील कोणीच पुढे येत नाही. गुणवत्तेचा प्राथमिक पाया ढासळत असल्याने त्यावर शासन पातळीवर ठोस उपाययोजनांची गरज आहे. आगामी काळात या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा: आंतरजिल्हा बदलीसाठी 11 हजार शिक्षक इच्छुक! दिवाळीनंतर बदल्या

कोरोनामुक्‍त गावांमध्ये पारावरच्या शाळा सुरू केल्यानंतर नियमांचे पालन करून मुलांना शिक्षणाचे ऑफलाइन धडे दिले. जिल्हा परिषदेच्या दोन हजार प्राथमिक शाळांची रंगरंगोटी करून त्या ठिकाणी स्वच्छता केली आहे. जिल्ह्यातील सुमारे 800 गावे कोरोनामुक्‍त झाली असून त्या ठिकाणी ऑफलाइन शाळा सुरू होऊ शकतात. परंतु शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

राज्यातील शिक्षणाची दुरवस्था...

  • पहिली ते बारावीच्या शाळा : 93,016

  • विद्यार्थी संख्या : 2.02 कोटी

  • ऑनलाइन शिक्षणातील विद्यार्थी : 1.07 कोटी

  • ऑनलाइनपासून दूर विद्यार्थी : अंदाजित 95 लाख

loading image
go to top