esakal | वैरागच्या 'या' मोर्चामुळे संमत झाला रोहयो' कायदा
sakal

बोलून बातमी शोधा

रोहयो

वैरागच्या 'या' मोर्चामुळे संमत झाला 'रोहयो' कायदा

sakal_logo
By
संतोष कानगुडे

वैराग (सोलापूर) : दुष्काळात कामगारांच्या हाताला काम द्या, कामाचा दाम व धान्य द्या, या मागण्यांसाठी 6 सप्टेंबर 1971 रोजी वैराग (ता. बार्शी) येथे शासकीय गोदामावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. यात असंख्य लोक जखमी झाले तर आठ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले.

हेही वाचा: इकोफ्रेंडली बाप्पा संकल्पनेला हातभार! नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

वैरागच्या हौतात्म्याने संपूर्ण महाराष्ट्राला रोजगार हमी कायदा दिला. या घटनेला 6 सष्टेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही या घटनेचा इतिहास वैराग व भागातील जनता विसरू शकत नाही. 1971 साली बार्शी तालुक्‍यातील जनता दुष्काळात होरपळत होती. या पार्श्वभूमीवर वैराग व भागात दुष्काळाच्या भीषण झळा सोसणाऱ्या ग्रामस्थांनी दुष्काळी योजनात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.

विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते उद्धवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "हाताला काम द्या, कामाचा दाम व धान्य द्या' आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात माजी आमदार स्व. चंद्रकांत निंबाळकर, भाई विश्वासराव फाटे, भाई सर्जेराव सगर, भाई ज्ञानेश्वर पाटील, भाई सुभाष डुरे-पाटील, भाई गणपतराव जोशी, भाई जिवाजीराव पाटील, भाई रोहिदास कांबळे आदी नेते सहभागी झाले होते.

हेही वाचा: गणेशोत्सवाची ठरली नियमावली! पुजेसाठी 50 जणांनाच परवानगी

या वेळी प्रशासनाने जनतेच्या मागण्यांचा विचार करण्याऐवजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. होले, तत्कालीन उपजिल्हाधिकारी जोडवेकर व तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी डेमला यांनी मोर्चेकऱ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले. या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये हजारो लोक जखमी झाले, तर शेकडो लोक जायबंदी झाले. या वेळी आठ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले.

गोळीबाराचा खटला चालवण्यासाठी बार्शी येथे विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. यात मोर्चेकऱ्यांच्या बाजूने वकील म्हणून बी. एन. देशमुख यांनी काम पाहिले होते. अनेक वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू असताना शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शासनातर्फे हा खटला मागे घेतला. या सर्व इतिहासाच्या स्मृती आजही वैराग भागात जिवंत आहेत.

आठ हुतात्मे...

एकनाथ ज्योती साळुंके (वैराग), इब्राहिम चांदसाहेब शेख (वैराग), सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण (वैराग), बब्रुवाहन तुळशीराम माळी (मानेगाव), भास्कर बाबूराव वाळके (मानेगाव), रघुनाथ श्रीपती माने (रातंजन), उद्धव श्रीपती गोफणे (हळदुगे), चतुर्भुज विठ्ठल ताकभाते (श्रीपत पिंपरी) या आठ जणांना या वेळी हौतात्म्य पत्करावे लागले होते.

रोजगार हमी कायदा सहमत झाला

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर 1971 रोजी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अनेक गावांत मोर्चे काढण्यात आले. या मोर्चावर इस्लामपूर, नागपूर, वैराग या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. या मोर्चामुळेच महाराष्ट्रात रोजगार हमीचा कायदा सहमत करण्यात आला हे विशेष.

loading image
go to top