esakal | कोरोनाचा ऊस गाळपावर परिणाम होण्याची शक्‍यता; ऊसतोडणीसाठी मजूर न येण्याची भिती 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona is likely to affect sugarcane threshing Fear of non arrival of laborers for cutting sugarcane

कारखान्यांना हे करावे लागणार 

  • ऊसतोडणी मजूर व कामगारांसाठी क्वारंटाइन सेंटरची उभारणी 
  • ऊसतोडणी मजूर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था 
  • मजूर व कामगारांच्या दैनंदिन तपासणीसाठी वैद्यकीय पथकाची व्यवस्था 

कोरोनाचा ऊस गाळपावर परिणाम होण्याची शक्‍यता; ऊसतोडणीसाठी मजूर न येण्याची भिती 

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : महाराष्ट्र व देशातही ऊस कापणीसाठी लाखो स्थलांतरीत मजुरांची गरज भासते. कोरोनाचे देशातील वाढते संक्रमण पाहता हे मजूर देशभरात प्रवास करण्यास घाबरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रचंड असलेल्या उसाच्या गाळपास विलंब लागण्याची शक्‍यता आहे. 
महाराष्ट्र आणि देशातील ऊस गाळप हंगाम ऑक्‍टोबरमध्ये सुरू होतो. आपल्याकडे अद्याप म्हणावे तितके साखर उद्योगात ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण झालेले नाही. ऊस तोडणीसाठी देशातील बहुतांश साखर कारखाने स्थलांतरीत मजुरांवरच विसंबून आहेत. 38 लाख कोरोना बाधितांच्या संख्येसह देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे. 
ब्राझीलनंतर साखर उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र, 50 लाख ऊस उत्पादक व 700 साखर कारखाने असलेल्या भारतात ऊस तोडणीत फक्त पाच टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. तुलनेत ब्राझीलमध्ये 100 टक्के ऊसतोडणी यांत्रिक पद्धतीने केली जाते. 
महाराष्ट्रात ऊसतोडणी मजुरांची संख्या 7 ते 9 लाख आहे. त्यातील बहुतांश मजूर राज्यात तर काही परराज्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतरीत होतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधील साखर कारखाने ऊस तोडणीसाठी हंगामी स्थलांतरीत मजुरांवरच अवलंबून आहेत. यातील अनेक मजूर कोरोनाच्या भीतीने यावर्षी ऊसतोडणीस येण्याची शक्‍यता कमी आहे. कोरोनामुळे हे मजूर स्थानिक ठिकाणीच किफायतशीर काम स्वीकारण्याची भीती आहे. त्यामुळे अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या राज्यातील गाळपाची स्थिती मजुरांच्या उपलब्धतेवरच अवलंबून राहणार आहे. राज्य सरकारने कोरोनासंदर्भात सर्व कारखान्यांना निर्देश दिले आहेत. 

मजुरांचा प्रश्न गंभीर 
ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. मजूर गावापासून दूर जायला तयार नाहीत. याचा परिणाम पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांवर होईल. इतर भागात फारसा परिणाम जाणवणार नाही. हंगामाच्या प्रारंभीच्या काळात थोडाफार परिणाम जाणवेल. पण हळूहळू तो भरून येईल. स्थानिक पातळीवर होणारी ऊसतोडणी व ऑक्‍टोबरमधील कोरोनाच्या स्थितीवर बरेच काही अवलंबून आहे. 
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) 

तर येथील मजूर 
सध्या तर मजूर येतो म्हणत आहेत. कोरोनाचा काही प्रमाणात परिणाम जाणवणार आहे. कोरोनाचा सध्या वाढता आलेख आहे. थोडा कमी व्हायला सुरुवात झाली तर मजूर येतील. 
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य साखर संघ, मुंबई 

संपादन : वैभव गाढवे