मासिक पाळी दिन : करोनाचं विलगीकरण संपलं; पाळीच्या विलगीकरणाचं काय ?

स्त्रीशिक्षणाची सुरुवात करणारे समाजसुधारक पुरूषच होते. “शिकावं की नाही हा बायकांचा वैयक्तिक प्रश्न”, असं म्हणून या समाजसुधारकांनी पळवाट काढली असती तर आजचं चित्र कसं असलं असतं ?
superstitions about menstruation
superstitions about menstruationsakal

लेखन - नमिता धुरी

“आई म्हणते जिथे आपलं नुकसान होत नाही ना, तिथे वाद नाही घालायचा”. माझ्या एका मैत्रिणीचं ते वाक्य माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला आणि बंडखोर मनोवृत्तीला बाणासारखं पोखरत गेलं; कारण, चर्चा सुरू होती मासिक पाळीविषयीच्या प्रथेची. अन्य एका मैत्रिणीचं लग्न ठरल्याची चर्चा जोडीदाराच्या विचारसरणीबाबतच्या आमच्या अपेक्षांकडे वळली. त्यात हा मासिक पाळीचा मुद्दा मीच उकरून काढला.

पाळी सुरू असताना देव्हार्‍यापासून दूर राहिल्याने आपलं काहीच नुकसान होत नाही, या तथाकथित समंजस विचारांच्या संस्कारांत वाढलेली माझी ती मैत्रीण कला शाखेतील म्हणजेच एका सर्जनशील आणि वैचारिक गोष्टींना वाव देणार्‍या शाखेची पदवीधर आहे. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत असून रोज कामानिमित्त ५ देशांमधल्या लोकांशी त्यांच्या-त्यांच्या भाषांमध्ये संवाद साधते. या सर्व गोष्टींचा विचार करता माझी ती मैत्रीण आधुनिक पिढीतील करती-सवरती आणि प्रगतीकडे वाटचाल करणारी एक स्वावलंबी स्त्री आहे याची कल्पना येईल.

मुलगी जेव्हा स्त्री होते तेव्हा तिच्या पोटात दुसरा जीव वाढवण्याची क्षमता निर्माण होते. बाळासाठी आवश्यक तेवढं रक्त दर महिन्याला बाजूला काढलं जातं. बाळाचं बीज रुजलेलं नसताना ते बाहेर टाकलं जातं. बाळाचं बीज रुजलेलं असल्यास ते रक्त त्याच्यासाठी वापरलं जातं. हे इतकं साधं विज्ञान माझ्या त्या मैत्रिणीला आणि तिच्यासारख्याच इतर मुलींना कळत नसेल का ? नक्कीच कळतं. पण घरात देवकार्य सुरू असताना मासिक पाळी आली तर शेजाऱ्यांकडे मुक्काम करावा, एरव्ही घरभर फिरलं तरी चालेल पण देव्हाऱ्याजवळ जाऊ नये, नैवेद्याला हात लावू नये या गोष्टी या मुलींच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की, ‘आपण हे का करतोय’, इतका साधा प्रश्न त्यांना पडत नाही. माझ्यासारख्या मुली जेव्हा असा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा असं लक्षात येतं की, ‘आम्ही चुकीचे आहोत’, हे कोणीच अमान्य करत नाहीये. पण ‘आम्ही इतरांपेक्षा कमी चुकीचे आहोत’, या समाधानात मुली जगत असतात.

आमच्या गावच्या घरी पाळी आलेल्या बाईला मागच्या दाराकडे कोपऱ्यात बसावं लागतं. कुठे हात-बोट लावता येत नाही. आमच्या मुंबईतल्या घरात मात्र पाळी आलेली असताना आम्ही घरभर फिरतो. फक्त देव्हाऱ्याजवळ जात नाही. मुलींच्या आया नेमक्या याच गोष्टीची ढाल करतात. “गावच्या लोकांसारखं आम्ही तुम्हाला बंधनांत ठेवलं आहे का ? घरभर फिरायला देते ना मी तुम्हाला ! मग देव्हाऱ्याजवळ जाण्याचा हट्ट का ?” सुशिक्षित घरांमध्ये यालाच पुढारलेपण म्हटलं जातं. शहरी संस्कृतीतील विभक्त कुटुंबपद्धतीत घरात एखादीच बाई असते. तीसुद्धा पाळीच्या निमित्ताने कोपऱ्यात बसून राहिली तर घरातल्या पुरूषांना खायला कोण घालणार ? ती नोकरी करत असेल तर कामाचे दिवस बुडून झालेले आर्थिक नुकसान कसे भरून निघणार ? या प्रश्नाचं उत्तर म्हणून मासिक पाळीतही बाई घरभर फिरू लागली. पण देवकार्यापासून दूर राहण्याची प्रथा काही तिने मोडली नाही. अशा अर्ध्यामुर्ध्या पुढारलेपणात जगणाऱ्या बायका आधुनिक विचारांच्या समजल्या जातात.

महाराष्ट्राच्या इतर भागांत हुंडाबळीच्या घटना घडल्या की, कोकणी माणसं फेसबुकवर पोस्ट टाकतात. आमच्याकडे एकाही लग्नात म्हणे हुंडा घेतला जात नाही. जी प्रथा आपल्याकडे अस्तित्त्वातच नाही ती मोडल्याच्या अभिमानात किती दिवस रमायचं, हे ठरवता आलं पाहिजे. हुंडा न घेणारे फार काही प्रगल्भ विचारसरणीचे आहेत असं मानण्याची गरज नाही; कारण कोकणात वादळ आलं तरी शिवाशिवीची मुलगी कुटुंबाजवळ जात नसल्याची उदाहरणं आम्ही ऐकली आहेत.

माझ्या पिढीतल्या काही मुलींचं असंही म्हणणं असेल की, “आम्हाला देवपूजेची आवड नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावर भांडत नाही”. आवड तर मलाही नाही. मग मी का यावर वाद घालते ? दु:ख म्हातारी मेल्याचं नसतं. पण काळ सोकावतो त्याचं काय करायचं ? देवपूजा न केल्याने नुकसान होत नसेलही पण मासिक पाळीला कमी लेखण्याची पर्यायाने स्त्रियांना कमी लेखण्याची मनोवृत्ती बळावते ना !

मोकळ्या वातावरणात वाढलेल्या मुलीसुद्धा आईचं मन जपण्यासाठी असले विषय ताणून धरत नाहीत. वरून सांगतात की, “आम्ही असं मानत असलो तरी हे विचार आम्ही कोणावर लादत नाही”. आईला विरोध करू न शकणाऱ्या मुली उद्या सासूला तरी कसा विरोध करतील ? मुलगी म्हणून ज्या प्रथा पाळल्या त्या सून म्हणूनही पाळल्या जातील; पण उद्या तुम्हाला मुलगी झाली आणि तिने यावर प्रश्न उपस्थित केले तर, “आजीचं मन जपण्यासाठी पाळ थोडे दिवस”, हेच उत्तर तुम्ही देणार नाही कशावरून…. आणि राहणार असाल तुम्ही मुलीच्या बाजूने उभ्या तर, कुटुंबाच्या विरोधात जाण्याची ताकद चाळीशीत कुठून आणणार आहात जी ऐन पंचविशीतही तुमच्यात नाही ?

आईचं मन जपण्यासाठी मुली हे सगळं करतात. पण मुलीचं मन जपण्यासाठी कोणतीही आतार्किक प्रथा मोडण्याची आईची तयारी असते का ? वडिलधाऱ्यांचं मन जपण्याचं कारण मुली देत असल्या तरी बऱ्याचदा अशा प्रथांना विरोध न करण्यामागे वेगळीच कारणं असतात. ‘डोक्याला कटकट नको असणे’, हे पहिलं कारण. असे मुद्दे लावून धरायचे म्हणजे थोडासा ताण घ्यावा लागतो, रोष पत्करून घ्यावा लागतो, आपला मुद्दा अधिक ठाम करण्यासाठी थोडंसं वाचनही करावं लागतं. गोडगुळमिळीत आयुष्य जगण्याची सवय लागलेल्या मुलींना ही सगळी कटकट नको असते. दुसरं कारण ‘स्वत:ची प्रतिमा जपणं’. कोणत्याही गोष्टीवर शांतपणे प्रतिक्रिया देणे, कोणाशीही वाद न घालणे म्हणजे सभ्यपणा आणि प्रतिप्रश्न विचारणे, वाद घालणे म्हणजे असभ्यपणा असा समज मुलींच्या मनात असतो. त्यामुळे स्वत:ची सभ्य, समजूतदार, चांगली मुलगी अशी प्रतिमा जपण्यासाठीही मुली अशा प्रथांना विरोध करणे टाळतात.

पुरुषांची भूमिका

“बायकांच्या विषयात आम्ही पडत नाही”, असं म्हणून काही पुरूष सभ्यपणाचा आव आणतात. प्रत्यक्षात ते अशा विषयांपासून पळ काढत असतात आणि दुसरं म्हणजे बाईच बाईची शत्रू आहे हे त्यांना चांगलंच कळून चुकलेलं असतं. त्यामुळे आपल्या या प्रथा कधीच मोडल्या जाणार नाहीत याची त्यांना खात्री असते.

अजूनही आपल्याकडे मुलींना ठरावीक पद्धतीनेच वाढवलं जातं. पुरुषांचं सामाजिक स्थान किंचित का होईना पण अजूनही उच्च आहेच. त्यामुळे मुली न्यूनगंडातच जन्माला येतात आणि तसंच आयुष्य जगत राहतात. परिणामी कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याची ताकद त्यांच्यात येत नाही. मुलगी असूनही आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं, मोठं केलं या ऋणात मुली मोठ्या होतात. शिवाय प्रत्येक मुद्द्यावर आपण भांडत राहिलो तर आपल्याला पसंत कोण करणार आणि सासर टिकवायचं असेल तर माघार घ्यावीच लागेल, वगैरे वगैरे संस्कार कळत-नकळत मुलींवर होत असतात. दुसऱ्या बाजूला कोणताच दोष नसलेली आपली सर्वगुणसंपन्न संस्कृती जपण्याची जबाबदारी स्त्रियांचीच आहे असंही त्यांच्या मनाने घेतलेलं असतं. या अशा वातावरणात वाढलेल्या मुली स्वाभाविकपणे आपल्या चौकटीतून बाहेर पडत नाहीत. अशावेळी पुरुषांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचं असतं.

“लग्न करेन तर प्रगल्भ विचारसरणीच्या मुलीशीच”, अशी भूमिका एकही मुलगा घेताना दिसत नाही. लग्न झाल्यानंतरही या विषयावर पत्नीचं प्रबोधन वगैरे करण्याचा या पुरुषांचा विचार नसतो. “माझी बायको स्वत:च तसं वागते. मी मात्र असल्या गोष्टी मानत नाही”, असं म्हणून समाजात स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न मात्र हे पुरूष करत राहतात.

आजही अनेक घरांमध्ये मोठे निर्णय एखाद्या पुरुषाच्याच मार्गदर्शनाखाली होतात. त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. अशावेळी पुरुषाने आपल्या उच्च स्थानाचा फायदा घेऊन काही चांगले बदल घडवणं अपेक्षित आहे. “मासिक पाळीची शिवाशीव ही अंधश्रद्धा आहे, हे आम्हाला कितीही पटलं तरी आम्ही आमचे विचार कोणावर लादत नाही. शेवटी हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो”, असं म्हणून पुरूषांनी आपली जबाबदारी झटकू नये. अनेक वैयक्तिक निर्णयांचे परिणाम सामाजिक असतात म्हणून त्यांना विरोध करायचा असतो. माणसाचं मन कोणतेतरी विचार स्वीकारतंच. त्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी लादल्या नाहीत तर वाईट गोष्टी नक्कीच लादल्या जातील. पत्नीचे विचार तुम्ही बदलू शकला नाहीत तरी तुमच्या मुलीवर तुमचाही अर्धा हक्क असतोच. त्या हक्काचा वापर करून तरी तुम्ही तिला या भंपक परंपरेतून बाहेर काढणं अपेक्षित आहे.

स्त्रीशिक्षणाची सुरुवात करणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे समाजसुधारक पुरूषच होते. “शिकावं की नाही हा बायकांचा वैयक्तिक प्रश्न. आम्ही त्यात पडणार नाही”, असं म्हणून या समाजसुधारकांनी पळवाट काढली असती तर आजचं चित्र कसं असलं असतं, याचा विचार पुरुषांनी केला पाहिजे.

करोना सुरू झाला तेव्हा विलगीकरण किंवा क्वारंटाइन ही संकल्पना सर्वांसाठीच नवीन होती. आपल्या माणसांचा स्पर्श होऊ न देता त्यांच्यापासून लांब, एखाद्या खोलीत एकटं राहायचं. जेवणसुद्धा लांबूनच घ्यायचं. आपण ज्या वस्तूला हात लावला ती वस्तू टाकून तरी दिली जाईल किंवा सॅनिटायजरने ‘शुद्ध’ तरी करून घेतली जाईल अशी स्थिती होती. हे जगणं त्रासदायक वाटून अनेकांनी विलगीकरणातून पळ काढला. गुपचूप गावी जाणं, गावी पोहोचल्यावर स्थानिक प्रशासनाला कल्पना न देणं, हातावर शिक्के असतानाही प्रवास करणं, असं सगळं सुरू झालं. हे असं विलगीकरणातलं जगणं त्रासदायक आहे हे कळून चुकलंय ना, मग आता तरी मुलींना ४ दिवस वाळीत टाकणाऱ्या या अशा प्रथांचा पुनर्विचार आपण करणार आहोत का ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com