राज्यात पुढच्या आठवड्यात चारच दिवस लसीकरण मोहीम; आरोग्य विभागाची माहिती

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

देशभरात शनिवारी मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. 

मुंबई - कोविड 19 लसीकरण मोहिमेची आज (दिनांक 16 जानेवारी 2021) सुरुवात झाली. दिवसभर लसीकरण मोहिम सुरळीत पार पडली. दरम्यान राज्यातील लसीकरण मोहिमेला 18 तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. आता यावर राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये दि. १८ जानेवारी पर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्ता संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले  कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असल्याने ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. मात्र यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक 17 जानेवारी 2021 आणि सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 असे दोन दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

 

हे वाचा - Corona Vaccination: PM मोदींसह इतर मंत्री लस कधी घेणार? संरक्षण मंत्र्यांनी दिलं उत्तर

जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरणाला शनिवारी (ता.16) भारतात सुरवात झाली. कोरोना विरुद्धच्या लढाईचा ऐतिहासिक निर्णायक क्षण म्हणून या लसीकरणाकडे पाहिले जात आहे. सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांसह देशभरातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना उद्देशून भाषण केले. त्यानंतर लसीकरणाला सुरवात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccination stop in maharashtra on sunday due to cowin app issue