धक्‍कादायक! 'या' कारणाने वाढत आहेत कोरोनाचे बळी; रुग्ण वाढीचाही वेग वाढला

तात्या लांडगे
Monday, 22 June 2020

मृत्यूची प्रमुख कारणे... 

 • झोपडपट्टी एरियात दहा-बारा लोक एकाच कुटुंबात राहतात 
 • लक्षणे असतानाही वेळेत दवाखान्यातून उपचार घेत नाहीत 
 • सोलापुरातील विडी कामगार, गारमेंटमधील मजूरांना पूर्वीपासूनच फुफ्फूसाचे आहेत आजार 
 • मधुमेह, रक्‍तदाब असतानाही ते नियमित घेत नाहीत औषधे 
 • दारु पिणारे कामगार, उशीरा दवाखान्यात दाखल होणारे लोकांचे वाढले मृत्यू 

सोलापूर : राज्यात 5 जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 80 हजार 229 होती. आता 21 जून रोजी ही संख्या तब्बल एक लाख 32 हजारांवर पोहचली आहे. दुसरीकडे मृत्यूदर कमी करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र समित्यांची स्थापना करुनही मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. मागील 15 दिवसांत राज्यात तीन हजार 321 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या आता सहा हजार 170 झाली आहे. त्यामध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून सोलापूर सहाव्या क्रमांकावर आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी देशात कोरोनाचा उद्रेकाची शक्‍यता व्यक्‍त केली होती. आता त्यानुसार वाटचाल सुरु असल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्ससह अन्य नियमांचे पालन करण्याचे सातत्याने आवाहन केले असतानाही नियमांचे उल्लंघन करुन बाजारपेठांसह रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. मागील 15 दिवसांत राज्यात रुग्ण दुपटीचा वेग वाढला असून 5 जूनपासून 21 जूनपर्यंत तब्बल 50 हजार रुग्ण वाढले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असतानाच दुसरीकडे रुग्ण वाढीचा आलेख वाढत असल्याची चिंता व्यक्‍त केली जात आहे. त्यातच मृत्यूचा दरही दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर असून ठाणे, पुणे, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, रायगड, पालघर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल पाच हजार 620 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे राज्याच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. 

मृत्यूदरातील टॉप टेन जिल्हे 

 • मुंबई : 3,671 
 • ठाणे : 716 
 • पुणे : 601 
 • जळगाव : 182 
 • औरंगाबाद : 174 
 • सोलापूर : 172 
 • नाशिक : 152 
 • रायगड : 91 
 • पालघर : 90 
 • अकोला : 63 

नियमांचे तंतोतंत पालन केल्याशिवाय कोरोना होणार नाही हद्दपार 

सोलापुरात झोपडपट्ट्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर लक्षणे नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही अधिक झाली आहे. झोपडपट्ट्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक असून लक्षणे असतानाही ते वेळेत उपचार घेत नाहीत. तसेच विडी कामगार, गारमेंट उद्योगातील कामगारांना पूर्वीपासूनच फुफ्फूसाचे आजार आहेत. त्यांना मधुमेह, उच्च रक्‍तदाब असतानाही ते नियमित औषधोपचार घेत नसल्याचे समोर आले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये एकाच कुटुंबात दहा-दहापेक्षा अधिक लोक राहत असून त्यांच्यामध्ये विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असल्योचही दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरकरांनी नियमांचे तंतोतंत पालन करण्याची खूप मोठी गरज आहे. नियमांचे तंतोतंत पालन केल्यास आपण निश्‍चितपणे कोरोनाला हद्दपार करु शकतो. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

 

मृत्यूची प्रमुख कारणे... 

 • झोपडपट्टी एरियात दहा-बारा लोक एकाच कुटुंबात राहतात 
 • लक्षणे असतानाही वेळेत दवाखान्यातून उपचार घेत नाहीत 
 • सोलापुरातील विडी कामगार, गारमेंटमधील मजूरांना पूर्वीपासूनच फुफ्फूसाचे आहेत आजार 
 • मधुमेह, रक्‍तदाब असतानाही ते नियमित घेत नाहीत औषधे 
 • दारु पिणारे कामगार, उशीरा दवाखान्यात दाखल होणारे लोकांचे वाढले मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona victims on the doubled rise