
सोलापूर : आपल्या प्रभागात केलेली कामे शहरवासियांना कळण्यासाठी अनेक नगरसेवक सोशल मिडीयाचा वापर करतात. या माध्यमातून ते काही क्षणातच हजारो नेटिझन्सपर्यंत पोचतात. सोलापुरात मात्र वेगळाच प्रकार झाला आहे. दारु पिण्याचे परवाने मिळवून देण्यासाठी चक्क भाजपच्या एका नगरसेविकेने पुढाकार घेतला आहे, तशी पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. दारुबंदीसाठी महिला पुढाकार घेत असताना जबाबदार नगरसेविका असूनही दारुसंदर्भात पोस्ट टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, आयुक्त, अधिकारी, विविध पक्षाचे प्रमुख आणि पत्रकारांचा हा ग्रुप आहे. या ग्रुपवर भाजपच्या एका माजी सभापती व नगरसेविकेने चक्क दारू परवाना हवा असेल तर संपर्क साधा अशी जाहीरात असलेली पोस्ट केली आहे. प्रभागातील विकासकामांबाबत किंवा नागरिकांच्या समस्यांबाबत कधीही सोशल मिडीयावर पोस्ट न करणाऱ्या नगरसेवकांनी दारुचा परवाना मिळवण्यासाठीची पोस्ट करण्यात किती तत्परता दाखवली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हा प्रकार ग्रुप ऍडमिनच्या ध्यानी आल्यावर त्या नगरसेविकस ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले.
सोलापूर महापालिकेत 52 नगरसेविका असल्या तरी बहुतांश नगरसेविकांचे पती, मुलगा किंवा भाऊच कारभार पाहतात. त्यात काही नवीन नाही. आता पोस्ट व्हायरल झाल्यावर, नगरसेविका नाही तर नगरसेविकेच्या पतीने पोस्ट केली असे स्पष्टीकरण येईल. मात्र महापालिकेच्या दिनदर्शिकत संबंधित क्रमांक हा
नगरसेविकेच्या नावाने आहे. त्यामुळे ग्रुपवर नगरसेविकेच्या नावानेच हा क्रमांक सर्वांच्या मोबाईलवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित नगरसेविकेने कितीही कांगावा केला की ही पोस्ट मी टाकली नाही तर, त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षाच्या नगरसेविकेकडून हा प्रकार झाल्याने विरोधकांना आता आयते
कोलीत मिळणार आहे. या प्रकाराबाबत सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
... तर शासकीय मोटारीतून दिली असती सेवा
राज्यात व्यवस्थितपणे सुरु असलेले सरकार पाडण्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशा नगरसेवक व कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी ही खटाटोप सुरु आहे का, असा संतप्त प्रश्न विरोधी पक्षातील नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. बरे झाले, "त्या' नगरसेविका सभापती असताना हा निर्णय झाला नाही, अन्यथा सभापतीच्या मोटारीतूनही सेवा द्यायला मागे पुढे पाहिले गेले नसते,अशी उपरोधिक टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.