esakal | उद्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाउन’? पंधरा दिवस पुन्हा टाळेबंदीचे संकेत

बोलून बातमी शोधा

lockdown

मागील वर्षी केंद्र सरकारने अचानक लॉकडाउन केल्याने शेकडो मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने पूर्ण तयारीनिशी हे लॉकडाउन जाहीर करण्याचे नियोजन केले आहे.

उद्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाउन’? पंधरा दिवस पुन्हा टाळेबंदीचे संकेत
sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई - राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याची सरकारची पूर्ण तयारी झाली असून, १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, अशी खात्रीलायक माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत असेल. सार्वजनिक वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यावर कठोर निर्बंध राहणार असून केवळ अत्यावश्यक प्रवासाचीच मुभा राहील, असे सांगण्यात येते. राज्यातील गरीब व मजूर कामगारांसाठी काही प्रमाणात मदतीचे पॅकेज देण्यासाठी आज दिवसभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली.

दरम्यान, रूग्णालयातील कोव्हिड रुग्णांसाठी बेड उपलब्ध व्हावेत म्हणून सततच्या राजकीय हस्तक्षेपाचा ताण आरोग्य प्रशासनावर आहे. हा राजकीय हस्तक्षेप रोखण्याची विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे समजते. यासाठी राज्यस्तरावर २४×७ अशी ‘वॉर रूम’ स्थापन करण्याच्या हालचालींनीही वेग घेतला आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मागील वर्षी केंद्र सरकारने अचानक लॉकडाउन केल्याने शेकडो मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने पूर्ण तयारीनिशी हे लॉकडाउन जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. यासाठीच्या सर्व मार्गदर्शन सूचना आणि अंमलबजावणीची यंत्रणा याबाबत सखोल चर्चा करून शासन आदेशाचीही तयारी झाली आहे.

आज गुढीपाडवा आणि उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे सरकारने १४ एप्रिलच्या मध्यरात्री पासूनच लॉकडाउन करण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी लॉकडाउनची मानसिकता तयार करावी, अशा प्रकारचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. या लॉकडाउन च्या दरम्यान आरोग्याच्या संपूर्ण सुविधांची क्षमता वाढवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होणार असून, दर दिवशी राज्यात ६ ते ७ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हे वाचा - मोठी बातमी - दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; वाचा कधी होणार?

ठळक मुद्दे
- गरीब मजूर व कामगारांना पॅकेज शक्य
- सार्वजनिक वाहतूक बंद नाही, पण निर्बंध लागणार
- विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई
- लक्षणे नसलेल्यांचे हॉटेलमध्ये विलगीकरण
- दररोज ६ ते ७ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट