धक्कादायक : कोरोनाची भीती नाही, देवी कोपणार म्हणून होतेय "या' परिसरात गर्दी! 

Poshamma
Poshamma

सोलापूर : कुटुंबाला रोगराईपासून मुक्त करणारी देवी, कुटुंबाचे पालनपोषन करणारी देवी म्हणून आषाढ महिन्यात 15 दिवस पोषम्मा देवीचा (मरिआई) उत्सव सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील मंदिरे प्रशासनाच्या आवाहनानुसार बंद ठेवण्यात आली आहेत. तरी कोरोनाची नव्हे तर देवी कोपणार म्हणून सोलापुरातील विविध पोषम्मा देवी मंदिरांसमोर महिला भाविकांची गर्दी दिसून येत आहे. 

कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे मंदिरे उघडण्यास असलेली बंदी लक्षात घेता यंदा मंदिरांमध्ये पोषम्मा सणच साजरा न करता भाविकांनी त्यांच्या घरातच व त्यांच्या कुटुंबापुरतेच हा सण साजरा करावा, असे आवाहन ज्या त्या समाजधुरिणांनी केले होते. शहरातील अनेक पोषम्मा व मरिआई देवीची मंदिरे सकाळी नित्योपचारानंतर बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र तरीही अंधश्रद्धेपोटी व देवी कोपणार म्हणून बंद असलेल्या मंदिरांसमोर व रस्त्यावरील एखाद्या शेंदूर फासलेल्या दगडाला देवी समजून नैवेद्य देण्यासाठी महिला भाविकांची गर्दी लोटत आहे. अनेकांच्या तोंडावर मास्कही दिसत नाहीत. सोबत आणलेल्या बकऱ्या व कोंबड्या देवीसमोर दाखवून घरी गेल्यावर त्यांचा बळी देऊन सामिष जेवणे झडत आहेत. यामुळे शहरातील वाढत्या कोरोना विषाणूचा फैलाव वाढत जाणार आहे. प्रशासन व पोलिस खात्याचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. 

असा साजरा होतो दरवर्षी आषाढोत्सव 
पावसाळ्याच्या काळात विविध रोगराई, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर ते अमावास्येच्या कालावधीत मरिआईचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. पूर्व भागातील तेलुगु समाजात मरिआईला पोषम्मा नावाने संबोधले जाते. विविध रोगराईपासून संरक्षण करण्याचे साकडे या सणानिमित्त भाविकांकडून घातले जाते. विविध देवी मंदिरांमध्ये पोषम्मा उत्सव (आषाढोत्सव) 15 दिवस चालतो. यानिमित्त भक्तगण हे देवीला नैवेद्य अर्पण करून साकडे घालतात. या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचे संकट आले आहे. चार हजारांवर कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली असून, 339 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी कोरोनाची भीती दूर सारून, देवी या रोगापासून मुक्ती देईल, अशी भावना मनात ठेवून भाविकांची मंदिरांसमोर गर्दी होत आहे. 

भाविक ऐकत नाहीत, त्यास आम्ही जबाबदार नाही 
मंदिरासमोर होणाऱ्या गर्दीबाबत शनिवार पेठ पोषम्मा मंदिराचे विश्‍वस्त प्रकाश चन्ना म्हणाले, आषाढोत्सव असल्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार दररोज सकाळी नित्यपूजा करून मंदिर बंद केले जात आहे. तरीही भाविक देवीला बकरे व कोंबड्या तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी करत आहेत. त्याची जबाबदारी आमची नाही. पोलिसांनी यांना रोखले पाहिजे. देवी कोपणार म्हणून मंदिरेच नव्हे रस्त्यावरील कुठल्याही शेंदूर फासलेल्या दगडाला देवी समजून नैवेद्य दाखवले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com