
Premier Award 2023: सकाळ प्रीमियर पुरस्काराची आजपासून प्रवेशप्रक्रिया
Sakal Premier Award 2023
मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणाऱ्या सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्याचा पडदा आता लवकरच उघडणार आहे. या मानाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी प्रवेश अर्जाची प्रक्रिया रविवार (ता. १२) पासून सुरू होत आहे.
प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे. ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एप्रिलमध्ये दिमाखदार सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. पहिला पुरस्कार सोहळा २०१७ मध्ये प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात पार पडला होता. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांबरोबरच हिंदीतील अभिनेते-अभिनेत्री आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरा पुरस्कार सोहळा पुण्यातील हडपसर येथे झाला होता.
तिसरा पुरस्कार सोहळा अतिशय रंगतदार वातावरणात पार पडणार आहे. कलाकारांचा एकापेक्षा एक नृत्याविष्कार, त्याच्या जोडीला चटपटीत विनोदाची फोडणी आणि खुमासदार सूत्रसंचालन अशा वातावरणात हा सोहळा रंगणार आहे.
मनोरंजनाच्या धमाकेदार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबरच हिंदीतील चमचमते तारे-तारकाही उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार सोहळा मराठीतील एका मनोरंजन वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.
नामवंत परीक्षकांचा चमू
सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रदर्शित झालेले आणि सेन्सॉर संमत चित्रपट पाठविता येणार आहेत. नामवंत परीक्षकांचा चमू चित्रपटांचे परीक्षण करणार आहे.
प्रवेश अर्ज आणि अधिक माहितीसाठी
संपर्क : ८८८८४ ९५०००
९८८११ ९३३४०