बंडखोरांच्या मनधरणीत अपयश

सकाळ वृत्तसेवा  
गुरुवार, 11 जुलै 2019

महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला.

मुंबई / बंगळूर -  कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई पोलिसांनी शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा, नसीम खान यांना ताब्यात घेतले होते. 

आठ बंडखोर आमदारांनी आज कर्नाटक सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले, तर काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिल्याने आघाडीच्या सिंहासनाला पुन्हा धक्का बसला  आहे.

काँग्रेसचे आमदार के. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांनी आज राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनीही आपण तत्काळ हे राजीनामे स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये बंडाचा झेंडा रोवून मुंबईत डेरेदाखल झालेल्या आघाडीच्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार हे मुंबईत आले होते. आज त्यांनी ज्या हॉटेलामध्ये बंडखोर आमदारांचे वास्तव्य आहे तेथे आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा, नसीम खान आदी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, पुढे त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी शिवकुमार यांना बळजबरीने मुंबई सोडायला भाग पाडल्याचे समजते.  या सर्व बंडखोर आमदारांनी आमच्या जिवाला धोका असल्याचे पत्र पोलिस आयुक्तांना दिले आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आपले राजीनामे तत्काळ स्वीकारावेत म्हणून बंडखोरांनी त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने दबाव आणायला सुरवात केली आहे. यासाठी आज या सर्व आमदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, त्यांच्या याचिकेवर उद्या (ता.११) रोजी सुनावणी होणार आहे.

बंडखोर आमदारांना मी चाळीस वर्षांपासून ओळखतो, त्यामुळे ते निश्‍चितपणे स्वगृही परततील, याचा मला पूर्ण विश्‍वास आहे.
डी. के. शिवकुमार, काँग्रेस नेते

हॉटेलबाहेर शांततापूर्ण मार्गाने माध्यमांशी चर्चा करीत असताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे, ही शरमेची बाब आहे.
मिलिंद देवरा, काँग्रेसचे नेते

राजकीय आघाडीवर
मुंबई पोलिसांचा कुमारस्वामींकडून निषेध
भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार
भाजपकडून राज्यपालांना निवेदन सादर
बंगळूरमध्ये आघाडीच्या नेत्यांची निदर्शने
कोलारचे आमदार श्रीनिवास गौडा दिल्लीला
विधानसौधमध्ये भाजप-काँग्रेस नेते भिडले
काँग्रेसचे दोन बंडखोरही मुंबईला जाणार

आ. सुधाकर यांना कोंडल्याने गोंधळ 
भाजपच्या ऑपरेशन कमळच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने सुरू असतानाच मंत्री एम. टी. बी. नागराज व सिद्धरामय्या यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे डॉ. सुधाकर यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला. दरम्यान, आमदार सुधाकर यांना कक्षात कोंडून ठेवल्याच्या आरोपावरून भाजप आमदारांनी विधानसौधमध्ये मोठा गदारोळ घातला व राज्यपालांच्या हस्तक्षेपातून पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. सुधाकर राजीनामा देण्यासाठी सभाध्यक्षांच्या कार्यालयात आले असता, त्यांना काँग्रेस नेत्यांनी जबरदस्तीने बोलावून मंत्री जॉर्ज यांच्या कक्षात नेण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D K Shivkumar efforts also failed