शेतकऱ्यांच्या दुधावरची साय खातंय कोण? खासगी संघ की शासन? दूध उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत 

संजय हेगडे 
Tuesday, 14 July 2020

कोरोना आणि लॉकडाउनमुळे शेतकरी संकटात असताना, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यातच दूध व्यवसायात काहीतरी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण चार-पाच महिने झाले शेतकऱ्यांच्या दुधावरची साय खासगी दूध संघ खात आहेत. दूध दरवाढ तत्काळ करावी व दुग्ध व्यवसायाला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून 15 रुपये प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

तिसंगी (सोलापूर) : शासनाने राज्यातील सर्व दूध संघांना प्रतिलिटर 25 रुपये दराने दूध खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र खासगी दूध संघ सरासरी 19 ते 20 रुपये दराने दूध खरेदी करून शेतकऱ्यांची परवड करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधावरची साय खातंय कोण? खासगी संघ की शासन, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

हेही वाचा : बार्शी तालुक्‍यातील रुग्णांची द्विशतकाकडे वाटचाल; सोमवारी आढळले 18 कोरोनाबाधित 

कोरोना आणि लॉकडाउनमुळे शेतकरी संकटात असताना, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यातच दूध व्यवसायात काहीतरी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण चार-पाच महिने झाले शेतकऱ्यांच्या दुधावरची साय खासगी दूध संघ खात आहेत. दूध दरवाढ तत्काळ करावी व दुग्ध व्यवसायाला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून 15 रुपये प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतमालाचे भाव प्रचंड घसरले आहेत. त्यातच दुधाचे भाव चक्क 15 रुपये घसरले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. 

हेही वाचा : ब्रेकिंग : करमाळा शहरात कोरोनाचा प्रवेश 

खासगी दूध संघाचे दर 

  • हॅटसन संघ : 24 रुपये (ऑनलाइन) 
  • सोनाई संघ : 23 रुपये (ऑनलाइन) 
  • प्रभात (सनफ्रेश) संघ : 19 रुपये (ऑनलाइन) 
  • पारस संघ : 20 रुपये 
  • दूध पंढरी : 25 रुपये 
  • रियल डेअरी : 22 रुपये 

असा आहे एक दिवसाचा खर्च... 
महाराष्ट्रात लाखो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत. आज पशुखाद्य, औषधोपचार व चारा यांचा खर्च पाहता एका गाईला एका दिवसासाठी 25 किलो चाऱ्यासाठी 60 ते 70 रुपये खर्च येतो. पशुखाद्य कमीत कमी पाच किलो व भुसा 10 किलो यासाठी 200 ते 225 रुपये, औषधोपचार व टॉनिक यासाठी 50 रुपये असा एकत्रित खर्च 400 ते 450 रुपये येतोय. आणि सर्वसाधारण एक गाय 15 ते 25 लिटर दूध देते. दर मिळतो 18 ते 20 रुपये. त्यामुळे दुधाचे 350 ते 400 रुपये होतात. दूध व्यावसायिक शेतकऱ्याचे कष्ट वेगळेच असतात. तो बिचारा फुकटातच राबत आहे, अशी प्रतिक्रिया प्रभात संघाचे मल्हारी हेगडे यांनी व्यक्त केली. 

तिसंगी येथील हॅटसन केंद्र चालक विष्णू ढोणे म्हणाले, कोरोनाच्या पडत्या काळात हॅटसन डेअरीने शेतकऱ्यांना चांगला दर दिला आहे. आज 24 रुपये दर असल्याने शेतकरी समाधानी आहे. इतर खासगी संघांनी शेतकऱ्यांची होरपळ सुरू केली आहे. 

दूध उत्पादक शेतकरी सचिन हेगडे म्हणाले, दुग्ध उत्पादक शेतकऱ्याचा व्यवसाय वाचवायचा असेल तर शासनाने प्रतिलिटर 10 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा करावे. 

मल्हारी पाटील म्हणाले, दुधाचे दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत असताना दुग्धविकास मंत्री काय करीत आहेत? 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dairy farmers in trouble as private milk unions pay lower rates