भोसेच्या पाटील घराण्यावर नियतीचा क्रूर घाला; तेरा दिवसांत तीन कर्त्या माणसांचा मृत्यू

सूर्यकांत बनकर 
Thursday, 13 August 2020

एक ऑगस्ट रोजी राजूबापू पाटील यांचे चुलते अनंतराव पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर चारच दिवसांत राजूबापू आणि त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अशातच 8 ऑगस्ट रोजी राजूबापूंचे सख्खे भाऊ महेश पाटील यांचे पुण्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच निधन झाले. पाटील कुटुंबीयांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आज रात्री राजूबापूंचीही प्राणज्योत मालवली. 

सोलापूर : जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आणि जिल्ह्याबरोबरच राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक नैतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला तारा निखळल्याची भावना सर्वत्र पसरली. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांचा एक खंदा समर्थक काळाच्या पडद्याआड गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहेच, पण भोसे (ता. पंढरपूर) येथील पाटील घराण्यातील या गेल्या तेरा दिवसांतील तिसऱ्या कर्तबगार माणसाचा मृत्यू झाल्याने राज्यातील राजकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग! अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राचा प्रस्ताव विद्यापीठातच धूळखात पडून 

एक ऑगस्ट रोजी राजूबापू पाटील यांचे चुलते अनंतराव पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर चारच दिवसांत राजूबापू आणि त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अशातच 8 ऑगस्ट रोजी राजूबापूंचे सख्खे भाऊ महेश पाटील यांचे पुण्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच निधन झाले. पाटील कुटुंबीयांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आज रात्री राजूबापूंचीही प्राणज्योत मालवली. त्यात भरीस भर म्हणजे त्यांचे निम्मे कुटुंबीय सध्या वेगवेगळ्या दवाखान्यांत उपचार घेत आहेत. एका आध्यात्मिक राजकीय घराण्यावर नियतीने घातलेला हा घाला ग्रामस्थांना पचविणे जड जात असून, "आमचा देव गेला' ही भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत आहे. राजूबापूंच्या निधनाची बातमी कळताच सोलापूरकडे लोकांचा ओघ चालू झाला असून, गावात चूलही पेटलेली नाही. 

हेही वाचा : सरकारचे "यूजीसी'कडे बोट ! "एटीकेटी' विद्यार्थ्यांसमोर नवा पेच 

पंढरपूर तालुक्‍यातील कै. औदुंबर पाटील आणि कै. यशवंतभाऊ पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी. या जोडगोळीने जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला राजकारणातील नैतिकता काय असते, हे स्वतःच्या वर्तणुकीतून दाखवून दिले. पंढरपूर तालुक्‍यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी करत तो चालविताना सभासदांच्या एक रुपयालाही टाच येणार नाही याची दक्षता यांच्यासह त्यावेळच्या सर्वच संचालक मंडळींनी घेतली होती. भोसे येथील यशवंतभाऊ पाटील यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास दाखविताना तीनवेळा पंचायत समितीचे सभापतिपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचे पहिले जिल्हाध्यक्षपद देऊ केले होते. शिवाय "विठ्ठल'चेही उपाध्यक्षपद यशवंतभाऊंनी भूषविले होते. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली होती. ही सर्व पदे असताना आणि खुद्द शरद पवारांचा विश्वास असतानाही भाऊंनी एकही वैयक्तिक संस्था उभी न करता सर्वसामान्य लोकांच्या सेवेलाच प्राधान्य दिले. स्वतःची शिक्षण संस्था उभारणे सहजशक्‍य असतानाही 1965 साली त्यांनी भोसे येथे रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय चालू करण्याला प्राधान्य दिले. सलग 40 वर्षे "रयत'च्या सेवेत राहताना कर्मवीर भाऊराव पाटलांप्रमाणेच "उपेक्षितांच्या मुलांचे शिक्षण' हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला. त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेल्या त्यांचे पुत्र राजूबापू पाटील यांनीही भाऊंचा वारसा समर्थपणे पुढे चालविताना कुठेही राजकारणातील नैतिकता ढळू दिली नाही हे विशेष. 

बदलत्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांनी अनेक वेळा त्यांना सोईस्कर भूमिका घेण्याविषयी दबाव वाढविला होता; पण शरद पवार यांच्यावरील निष्ठेला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. आध्यात्मिक घराण्याचा वारसा आणि राजकारणातील नैतिकता जपताना बापूंनी 12 हजाराहून अधिक लोकसंख्येच्या भोसे गावाचे पालकत्व लीलया पेलले होते. राजकारणातील बदलांना सामोरे जाताना त्यांनी तत्त्वाशी तडजोड न केल्याने त्यांची पीछेहाटही झाली, पण त्याची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांच्याच परवानगीने त्यांनी 2004 मध्ये पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढवित तब्बल 64 हजार मते मिळविली. त्यावेळी झालेल्या मतविभागणीमुळे त्यांना विजयापासून दोन पावले दूर राहावे लागले होते. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून केलेल्या कामाच्या आठवणी आजही लोक आवर्जून सांगतात. सध्याच्या राजकारणातील अनिष्ट बाबींवर ते अनेक वेळा उद्विग्न होऊन बोलायचे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना राष्ट्रवादी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी विचारणा झाली होती, पण त्यांनी मते मिळविण्यासाठी चोखंदळाव्या लागणाऱ्या गैरमार्गाचा वापर करणे आपणास शक्‍य नसल्याचे सांगत नकार दिला होता. केवढी ही नैतिकता! वडील यशवंतभाऊ यांच्यापाठोपाठ राजूबापूंनाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर स्थान मिळाले. येथेही त्यांनी भाऊ आणि रयतच्या तत्त्वांना जपतच कार्यभार सांभाळला. कदाचित रयतमध्ये 45 वर्षाहून अधिक काळ पिता-पुत्रांना मिळालेली संधी हे भोसे येथील पाटलांचे एकमेव उदाहरण असावे. 

अगदी मागील आठवड्यात दवाखान्यात दाखल होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजूबापू ग्रामस्थांच्या सेवेत रममाण होते. दररोज सकाळी 9 ते 12 हा तीन तासांचा वेळ ते ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देत होते. आधी लोकांचे समाधान आणि मगच जेवण हा त्यांचा शिकस्ता होता. राजूबापूंसारखा कुटुंबप्रमुख पाठीशी असताना ग्रामस्थांना कोणतीही समस्या सोडविण्यासाठी किंवा न्यायासाठी पोलिस ठाणे अथवा न्यायालयाची पायरी चढावी लागली नाही. राजकीय विरोधकांनाही राजूबापूंवर कधी टीका करावीशी वाटली नाही. ज्या "विठ्ठल'च्या उभारणीत वडील यशवंतभाऊंनी औदुंबरअण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्याच विठ्ठलची पीछेहाट त्यांना बघवत नव्हती. लोकांनी घाम गाळून पिकविलेल्या उसाला न्याय देता येत नसल्याने त्यांनी शरद पवार यांच्या परवानगीने खासगी कृषीराज शुगर कारखाना उभारला. त्याची जबाबदारी बंधू महेश पाटील यांच्यावर सोपविली. दोन गळीत हंगाम यशस्वीपणे पार देखील पडले. पण काळाने या गुणी घराण्यावर एकामागोमाग एक घाले घालताना केवळ 13 दिवसांत तीन कर्त्या माणसांवर झडप घातली आहे. आभाळच फाटले तर आता ठिगळ कुठे आणि कसे लावणार? अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. काळाचे काटे उलटे फिरविता येत नाहीत हे सत्य स्वीकारून प्राप्त परिस्थितीत आता राजूबापूंचे चुलते रावसाहेब पाटील, बंधू शेखर पाटील, पुत्र उपसरपंच गणेश पाटील यांना या दुःखातून लवकरात लवकर सावरत यशवंतभाऊ आणि राजूबापूंचा वारसा चालविण्याची ताकद आणि बुद्धी मिळावी. इतकेच! 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of three in thirteen days in Bhose's Patil family