ब्रेकिंग! अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राचा प्रस्ताव विद्यापीठातच धूळखात पडून

Solapur University
Solapur University

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, असे नामकरण झाल्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवींच्या साहित्यांचे अध्यासन केंद्र उभारण्यासंदर्भात समिती स्थापन झाली. चार सदस्यीय समितीने मार्च 2020 मध्ये साडेसतरा कोटींचा प्रस्ताव तयार करून कुलसचिवांकडे सादर केला. मात्र, अद्याप तो प्रस्ताव तेथून पुढे पाठविण्यात आला नसून, कुलसचिवांकडेच तो पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक कार्याची माहिती व्हावी, या हेतूने अध्यासन केंद्र उभारण्यास मदत करण्याचे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर विद्यापीठाने प्रा. डॉ. महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली अध्यासन समिती नियुक्‍त केली. त्या समितीत प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, रामभाऊ लांडे, स्वाती घाटुळे आणि प्रा. शिवाजी वाघमोडे यांचा समावेश करण्यात आला. अध्यासन केंद्रासाठी स्वतंत्र इमारत, ग्रंथसंपदा आणि केंद्राच्या देखभालीसाठी कर्मचारी, विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी संचालक व त्यांच्या मदतीला दोन सहकारी, केंद्राच्या देखभालीसाठी सुमारे 17 कोटी 50 लाख रुपये लागतील, असा प्रस्ताव समितीने विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल, असे विद्यापीठाने यापूर्वी सांगितले होते. मात्र, तसे काहीच झाले नसून तो प्रस्ताव अद्यापही विद्यापीठातच धूळखात पडल्याचेही सांगण्यात आले. याबाबत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. या अनुभवावरून आता अहिल्यादेवींचा आश्‍वारूढ पुतळा कधीपर्यंत उभारला जाणार, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण आहे. 

समितीच्या सदस्यांना कुलगुरूंची धास्ती 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी चार सदस्यांची समिती नियुक्‍त करण्यात आली होती. या समितीतील सदस्यांपैकी काहींना याबद्दल माहिती विचारली. मात्र, त्यांनी "नो कमेंट' असे उत्तर देत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना अथवा कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्याकडे बोट दाखविले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com