नि: शब्द वेदनेचा श्वास थांबला

नि: शब्द वेदनेचा श्वास थांबला

पीडितेच्या मृत्यूनंतर आक्रोश; हजारोंच्या साक्षीने अखेरचा निरोप!
सकाळ वृत्तसेवा 
हिंगणघाट (जि. वर्धा) - येथील नंदोरी चौकात माथेफिरू तरुणाने पेटविल्यामुळे गंभीर जळालेल्या तरुण प्राध्यापिकेची नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यूसोबत गेल्या सात दिवसांपासून झुंज सुरू होती. काल सकाळी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर तिची जीवनज्योत मालवल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी घोषित केले. तिच्या पार्थिवावर आज सायंकाळी दारोडा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

हिंगणघाटनजीकच्या दारोडा गावची रहिवासी असलेली तरुणी ‘बॉटनी’ या विषयाची अंशकालीन प्राध्यपिका होती. ती सोमवार (ता. ३) रोजी सकाळी महाविद्यालयात जात असताना नंदोरी चौकात तिच्याच गावातील विकेश नगराळे याने तिला अडवले आणि काही कळण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. यात ती गंभीररीत्या जळाली. तिला तातडीने उपचारासाठी नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल सकाळी तिचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तिची प्रकृती खालावली होती.

तिच्या मृत्यूची वार्ता कळताच हिंगणघाट, समुद्रपूरसह सभोवतालच्या गावांतील हजारो नागरिकांनी दारोडा गावाकडे धाव घेतली. नागपुरात शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दारोडा गावात आणण्यात आला. या वेळी नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा झाल्याशिवाय गावात मृतदेह आणू नका, असे म्हणत रस्ता रोखून धरला. त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर दगडफेकही केली; पण पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांत झालेल्या चर्चेअंती मृतदेह तिच्या घरी नेण्यात आला. तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

या वेळी राजकीय नेत्यांसह मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. नागरिकांच्या संतप्त भावना पाहता अंकितावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे पोलिस आणि प्रशासनाचे प्रयत्न होते; पण तिचा लहान भाऊ जळगावला बी.टेक शिकत आहे, तो आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अस्वस्थ आठवडा
ता. ३ : हिंगणघाट येथे सकाळी पेट्रोल टाकून प्राध्यापिकेस पेटविले. आरोपीला अटक
ता. ४ : राज्यात संताप, जनआक्रोश, पीडितेची प्रकृती गंभीर 
ता. ५ : महिला अधिकाऱ्याकडे तपास
ता. ६ : वर्धा जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
ता. ७ : पीडितेच्या उपचारासाठी सरकारकडून ११ लाख 
ता. ८ : आरोपीला न्यायालयीन कोठडी
ता. ९ : पीडितेच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष
ता. १० : सकाळी ६.५५ वाजता पीडितेचे निधन
राज्यभर संतापाची लाट, ग्रामस्थांचा शोक अनावर
आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची पोलिसांची माहिती 
आरोपीच्या घरासमोर चोख पोलिस बंदोबस्त. 
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे सरकारचे आश्‍वासन.
आरोपीला ताब्यात देण्याची गावकऱ्यांची मागणी. 
दारोडा गावात पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगणघाटची घटना अश्‍लाघ्य अशीच आहे. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

शिक्षिकेचा झालेला मृत्यू ही लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील राहील व गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेईल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला खरी श्रद्धांजली असेल. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
मुंबई - हिंगणघाट जळीत हत्या प्रकरणाच्या खटल्यासाठी  विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल, यावर कटाक्ष असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडिता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशारीतीने चालविण्यात येईल. त्यासाठी ॲड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com