कोविड-19 च्या गंभीर रूग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या टॉसिलीझुमॅबच्या मागणीत घट

भाग्यश्री भुवड
Monday, 4 January 2021

महाराष्ट्रातील कोविड-19 च्या गंभीर रूग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या टॉसिलीझुमॅबच्या 89 टक्के मागणीत घट झाली आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील कोविड-19 च्या गंभीर रूग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या टॉसिलीझुमॅबच्या 89 टक्के मागणीत घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वी टॉसिलीझुमबच्या वापराचे प्रमाण वाढले होते. मात्र आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. जुलैपर्यंत, टॉसिलिझुमॅबची राज्यात सुमारे 27 हजार डोसची मागणी होती, जी आता घसरून 3 हजारवर गेली आहे.

सध्या, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडे फक्त रेमडेसिव्हिर सारख्या अँटीव्हायरलची मागणी आहे. डिसेंबर 2020 पासून ऑक्सिजनची मागणीही जवळपास 40 टक्क्यांनी घटली आहे. कोविड -19 रूग्णांचे होणारे लवकर निदान हेच रुग्ण कमी होण्यामागचे मुख्य कारण असल्याचे अधिकारी आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

“सर्वत्र महामारीत सुरु होण्यापूर्वीची आणि आताच्या परिस्थितीत पूर्णपणे बदल झाला आहे. आधी टोसिलीझुमॅबच्या मागणीमध्ये जवळपास 80% वाढ झाली होती. त्यानंतर सर्व उत्पादकांना उत्पादन वाढवण्यास सांगितले होते, मात्र, आता मागणी कमी झाली आहे, असे एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा- 'ताज' हॉटेलचा दंड माफ तर बीएसईवर कारवाईचा बडगा,पालिका प्रशासनाकडून दुजाभाव

टॉसिलीझुमॅब इंजेक्शन्सच्या मागणीत घट होण्यामागे अनेक कारणे आहेत असे शहरातील डॉक्टर सांगतात. टॉसिलीझुमॅब 'सायटोकीन स्ट्रॉम झालेल्या गंभीर रूग्णांना देण्यात आले होते.  जे कधी कधी रुग्णांसाठी घातक ठरत होते. दुसरीकडे, उपचारांच्या सुरुवातीच्या काळात सौम्य आणि मध्यम रूग्णांना रेमडेसिव्हिर दिले जात होते. गेल्या 11 महिन्यांत लवकर निदान झाल्यामुळे, राज्यात गंभीरपणे संक्रमित होणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, ज्यामुळे टॉसिलिझुमॅबचा वापर मर्यादित झाला आहे.

“आजकाल सौम्य आणि लक्षणे नसलेले रुग्ण घेत आहोत, ज्यामुळे टॉसिलीझुमॅब रूग्णांना देणे हा काही पर्याय नाही. शिवाय, रेमडेसिव्हिरचा वापर आणि स्टिरॉइडच्या उपचारांमुळे खूप फरक जाणवत आहे. खरं तर, कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा थेरपी देखील प्रभावी आहे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टॉसिलीझुमॅबच्या वापरात नक्कीच घट आली आहे कारण, डॉक्टर्स आता टॉसिलीझुमॅबचे प्रिस्क्रिप्शन रुग्णांच्या नातेवाईकांना देत नाहीत. त्यामुळे, आधीपेक्षा आता टॉसिलीझुमॅबच्या मागणीत बरीच घट झाली आहे. 
दा. रा. गहाणे, सह आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, राज्य 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी टॉसिलीझुमॅब इंजेक्शन कोरोनासाठी उपयुक्त नसल्याचे रोश्च फार्मा या कंपनीकडून जाहिर करण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांच्या गरजेसाठी या इंजेक्शनबाबत एफडीएकडून कंपनीला विचारणा करुन उत्पादन वाढवण्याची विनंती केली गेली होती. मात्र, आता एकूणच हे या इंजेक्शनच्या मागणीत घट झाली आहे असे एफडीएचे म्हणणे आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Decreased demand for Tocilizumab critically ill patients covid 19 State


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decreased demand for Tocilizumab critically ill patients covid 19 State