
आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही, केसरकर भडकले
गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..., केसरकरांनी खडसावलं
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर आता राजकीय वाद उफाळून येत आहेत. दरम्यान, गद्दार हे गद्दारच आहेत. मात्र, ज्यांना वाटते त्यांनी अजूनही परत यावे असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. आता यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे खूप लहान आहात, गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्य ठाकरेंपेक्षा दुप्पट वयाचा माणुस आहे. मात्र, जेव्हा आदित्य ठाकरे येतात तेव्हा मी उठून उभा राहातो कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा आहे, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
हेही वाचा: ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता शिवसेनेला KDMC मध्ये मोठा धक्का
पुढे ते म्हणाले की, तुमच्याकडे तो वारसा आला असून तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे. आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव ठाकरेंकडून शिकावे, तुम्ही ते संजय राऊतांकडून शिकू नये, असा सल्ला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, केसरकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या टिपण्णीवरही तीव्र आक्षेप घेतला आहे. सोमय्या यांनी आज ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव असा केला आहे. उद्धव ठाकरेंबाबत सोमय्या जे बोलले ते चुकीचे आहे. ते आमचे नेते आहेत. सर्व भाजप नेते आणि आम्ही ठरवलं होतं की, आमच्या नेत्याविषयी वाईट बोलायचे नाही. यासंदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीसांना सांगितले असून ते त्याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: उमेश कोल्हे हत्याकांड : NIA च्या तपासातून आणखी एक धक्कादायक खुलासा
Web Title: Deepak Kesarkar Reaction To Aditya Thackeray Controversial Statement Balasaheb Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..