शिवजयंती तारखेनेच साजरी करण्याची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्सवास मर्यादा’
पूर्वी अनेक वर्षे परंपरेप्रमाणे अक्षयतृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात होती, तर काहीजण फाल्गुन महिन्यातील तृतीयेला शिवजयंती साजरी करतात. जन्मतारखेवरून वेगवेगळे मतप्रवाह असल्याने जयंती दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यास मर्यादा येत आहे. शिवजयंती अशाप्रकारे अनेक वेळा साजरी केली जात असल्याने महाराजांचा अवमानही होतो, असे संघटनेचे रघुनाथ चित्रे पाटील यांनी सांगितले.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीने साजरी करायची की तारखेने, यावरून राज्यात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शिवजयंती तिथीने साजरी करणाऱ्या शिवसेनेने यापुढे तारखेने शिवजयंती साजरी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा रिव्हॉल्यूशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनने मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवजयंती तारखेने साजरी करायची की तिथीने, यावरून राज्यात दोन मतप्रवाह असल्याने महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यास मर्यादा येत असल्याचे मत या संघटनांनी व्यक्‍त केले आहे. युतीच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवजयंतीची तारीख निश्‍चित करण्यासाठी अभ्यासक आणि इतिहासकारांची समिती स्थापन केली होती. या समितीने पुरावे व कागदपत्रांच्या आधारे १९ फेब्रुवारी १६३० याच दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे सांगितले असल्याने हीच तारीख प्रमाण मानावी. तसेच, देशात कामकाजासाठी इंग्रजी महिन्याचा वापर केला जातो. 

ठाकरे सरकारला धक्का? भाजपचे पुन्हा 'ऑपरेशन लॉटस'

छत्रपती शिवाजी महाराज हे देव किंवा पौराणिक कथेतील पुरुष नसून, आधुनिक भारताच्या सुरुवातीच्या काळातील एक ऐतिहासिक व्यक्‍तिमत्त्व होते. १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख वस्तुनिष्ठ साधनांच्या आधारे जाहीर करण्यात आल्याने शिवसेनेकडून तिचा स्वीकार केला जावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to be celebrated on Shiv Jayanti date