राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी | Drama Competition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी

पुणे - कोरोना, लॉकडॉऊनचे सांस्कृतिक क्षेत्रावर ऑक्टोबर महिन्यापर्यंत असलेल्या निर्बंधांमुळे नाट्यकर्मींना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेची प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केली आहे. अन्यथा ही स्पर्धा विशिष्ट लोकांसाठीच आयोजित केल्यासारखे होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षानेच केलेल्या मागणीला कॉंग्रेस कसा प्रतिसाद देणार, याकडे नाट्यकर्मींचे लक्ष लागले आहे.

याबाबत सांस्कृतिक मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आपण या कठिण परिस्थितीत पण स्पर्धेचे आयोजन करत आहात या बद्दल सर्व हौशी नाट्य कलावंतांतर्फे आपले खूप अभिनंदन. नाट्याची मांदीयाळी म्हणजे महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धा असते. परंतु, यंदा कोरोना आणि लॉकडॉऊनच्या काळात एकत्र येण्यावर प्रदीर्घ काळ निर्बंध होते. परिणामी इच्छा असूनही अनेक हौशी नाट्य कलावंतांना एकत्र येऊन सराव करता आलेला नाही. राज्य नाट्य स्पर्धेची सूचना नुकतीच जाहीर झाली. त्यात स्पर्धेची प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असल्याचे म्हटले आहे. मात्र, राज्याच्या विविध भागांत सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत तीव्र स्वरूपाचे निर्बंध होते. त्यामुळे या स्पर्धेसाठी प्रवेशिक भरण्यासाठी किमान १५ दिवसांची मुदतवाढ गरजेची आहे. त्यामुळे यामुळे जास्तीत जास्त संघाचा स्पर्धेत सहभाग वाढेल. स्पर्धा सुरू होण्याची तारीख १ जानेवारी २०२२ आहे ती १ फेब्रुवारी २०२२ करण्याची गरज आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी होणाऱ्या संघांना तालमीस योग्य वेळ मिळेल आणि त्यातून ही स्पर्धा दर्जेदार होईल.’

हेही वाचा: माथेरानचा पशुवैद्यकीय दवाखाना मोजतोय अखेरची घटका; ZP चे दुर्लक्ष

या स्पर्धेसाठी तीन परीक्षक असतात. त्या पैकी दोन परीक्षक हे थिएटर आर्टचे पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. असा नियम करावा. या मुळे उत्कृष्ट अभ्यास असलेले व जागतिक नाटकाचे व भारतीय नाटकाचे भान असलेले परीक्षक स्पर्धेला लाभतील. गेल्या

दहा वर्षांपासून राज्यातील महत्त्वाच्या सगळ्या विद्यापीठांत थिएटर आर्ट पदवी व पदवी उत्तर अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे नाट्य अभ्यासक्रम घेऊन शिक्षित झालेले नवीन पिढीचे शेकडो कलावंत, दिग्ददर्शक, समीक्षक, लेख उपलब्ध आहेत- त्यांच्या ज्ञानाचा सुयोग्य उपयोग होईल व त्यांना कामाची संधी मिळेल. या साठी परीक्षक म्हणून थिएटर आर्ट मास्टर अथवा पीएचडी झालेल्यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी सांस्कृतिक मंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

loading image
go to top