माथेरानचा पशुवैद्यकीय दवाखाना मोजतोय अखेरची घटका; ZP चे दुर्लक्ष | Matheran news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Matheran

माथेरानचा पशुवैद्यकीय दवाखाना मोजतोय अखेरची घटका; ZP चे दुर्लक्ष

माथेरान : स्वयंचलित वाहनांना (self drive vehicle) बंदी असलेल्या माथेरानमध्ये (Matheran) प्रवासासाठी घोड्यांचा (horse) प्रामुख्याने वापर होतो. त्यामुळे या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी (Animal treatment) सुसज्ज रुग्णालयाची (furnished hospital) आवश्‍यकता आहे. मात्र, येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात (Animal hospital) एकही डॉक्टर (no doctor) नाही.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

माथेरानमध्ये ४६० परवानाधारक घोडे आहेत. इतर पाळीव प्राण्यांची संख्याही मोठी आहे. तसेच या गावाचा परिसर जंगल भाग असल्याने जंगली प्राणी-पक्षीही मुबलक आहेत. त्यानंतरही येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नाही. हा दवाखाना जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली आहे. या दवाखान्यात काही महिन्यांपासून येथील डॉक्टर अरुण राजपूत यांची बदली झाल्यानंतर निवासी डॉक्टर आजतागायत इथे आलेले नाहीत. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याला उतरती कळा लागली आहे.

कंपाऊंडला तबेल्याचे स्वरूप

पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर आणि परिचारक राहत नाहीत. त्याचा फायदा काही घोडेमालकांनी घेतला होता. आवारात रेलिंग आणि जाळ्यांना बांधलेल्या घोड्यांमुळे या आवारात सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरली आहे.

"माथेरानच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर रुजू झाले नाहीत. ते लवकरच येतील. दवाखान्याच्या आवारात बांधण्यात आलेल्या घोड्यांच्या मालकांची तक्रार लेखी स्वरूपात केली होती; पण पोलिसांकडून काहीही कारवाई झाली नाही."
- राम तिटकारे, परिचारक, पशुवैद्यकीय दवाखाना

हेही वाचा: Sakal Impact : ओवे कॅम्पची तहान मिटणार; नवीन जलवाहिनी जोडणीचे काम सुरू

"येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे आमच्या घोड्यांच्या उपचारासाठी जादा पैसे खर्च करून खासगी डॉक्टरला बोलवावे लागते. तसेच इथे औषधेसुद्धा मिळत नाहीत. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री आले असता घोडा शिबिराचा दिखावा करण्यात आला. त्यामध्ये पण आम्हाला औषधे दिली गेली नाहीत."
- आजम शेख, घोडे व्यावसायिक

"माथेरानचा पशुवैद्यकीय दवाखाना हा श्रेणी एक मध्ये येत असून अनेक महिने इथे डॉक्टर रुजू होत नाही, ही खेदाची बाब आहे. जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निवासी डॉक्टर दिला पाहिजे."

- दिगंबर चंदने, सामाजिक कार्यकर्ते

"काही दिवसांपूर्वी माझा घोडा गटारात पडला होता. पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला. जर डॉक्टर कार्यरत असते, तर कदाचित घोड्यावर उपचार होऊन त्याचे प्राण वाचले असते."

- राकेश कोकळे, घोडे व्यावसायिक

loading image
go to top