गोविंद पानसरे हत्या प्रकरण : तपास अधिकारी बदलण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

विचारवंत आणि भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे पोलिस अधिकारी बदलण्याची मागणी पानसरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे.

मुंबई - विचारवंत आणि भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे पोलिस अधिकारी बदलण्याची मागणी पानसरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे. याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने आज दिले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तिरुपती काकडे हे अधिकारी तपास करत आहेत. यापूर्वीच्या तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. आतापर्यंत तपासात विशेष प्रगती झालेली नाही. त्यामुळे पानसरे कुटुंबीयांनी तपास अधिकारी बदलण्याबाबत अर्ज केला असावा, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. अशा प्रकारचा अर्ज याचिकादारांवर उलटू नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या मागणीला एसआयटीचा विरोध असेल. याबाबतची भूमिका पुढील सुनावणीत स्पष्ट करू, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. 

पुणे सत्र न्यायालयात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राचा तपशील जाहीर झाल्याबाबतही उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना पुराव्याबद्दलची माहिती जाहीर होणे अभियोग पक्षासाठी योग्य नाही, असे मत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. 

दाभोलकरप्रकरणी शस्त्रशोधासाठी  परदेशी पाणबुड्यांची मदत 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांचे भाग मारेकऱ्यांनी ठाण्याजवळ खाडीत टाकल्याचे तपासात उघड झाले आहे. या शस्त्रांचे अवशेष शोधण्यासाठी परेदशी पाणबुड्यांची मदत घेण्यात येणार आहे. परंतु हे पाणबुडे नाताळच्या सणासाठी डिसेंबर ते जानेवारी या काळात मायदेशी जातील. त्यामुळे सीबीआयने मागितलेली 45 दिवसांची मुदतवाढ न्यायालयाने मान्य केली आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या पुण्यात ऑगस्ट 2013 मध्ये, तर पानसरे यांची हत्या फेब्रुवारी 2015 मध्ये झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for replacement of Investigating Officer in Govind Pansare murder case