ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची मागणी, सोलापुरात नियम करा, ज्याचा माल त्याचा हमाल 

प्रमोद बोडके
Saturday, 11 July 2020

महाराष्ट्रभर सर्वत्र या वाहतूकदारांकडून वारईच्या नावाखाली प्रचंड मोठी रक्कम सार्वत्रिकरीत्या वसूल केली जात आहे. वारई आणि माथाडी कामगार कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, मालधक्का व सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना व इतर अस्थापनांखाली वसूल केली जाणारी वारई वर कार्यवाही करावी लागेल.

- उदयशंकर चाकोते, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ

सोलापूर  : "ज्यांचा माल, त्याचा हमाल' हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. सोलापुरात मात्र मोटार मालकांच्या माथी हमाली मारली जात आहे. ही पद्धत बंद करून सोलापुरात ज्याचा माल त्याचा हमाल या नियमाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सोलापूर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्हा मोटार मालक संघाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक उदयशंकर चाकोते यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात लागू असलेल्या माथाडी कायद्याअंतर्गत उत्पादित मालक व शेतीमाल यांची हाताळणी जसे गोडाऊनमध्ये आवक, मालाचे वर्गीकरण, शेतीमालाचे, उत्पादित मालाचे वजन मापन, बांधाबांध शिवण, व रास अशी कामे माथाडी हमाल करतात. अशा कामाचा मोबदला त्याच ठिकाणचा असतो. कारखाने, विविध गोदामे, व्यापारी, दुकाने, सरकारी व खासगी बंदरे नियमानुसार माथाडी अथवा कामगारांना देतात. देशभरातील सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक जबाबदारीने सुरक्षितपणे करत आहेत परंतु हे करत असताना वाहतूकदारांच्या माथी हमालीचा खर्च मारण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

 ज्याचा माल त्याचा हमाल या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील वाहतूकदारांच्या मागणीचा आधार घेऊन कोल्हापूर, सांगली येथील वाहतूकदार संघटनांनी त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. 

सोलापुरातही ज्याचा त्याचा हमाल या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी सोलापूर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. यावेळी सोलापूर हुंडेकरी असोशियनचे सचिव बाबूराव घुगे, शिवानंद कोनापुरे, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन उपाध्यक्ष प्रकाश औसेकर, गोपाल पोला, वसीम इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Transport Association, make rules in Solapur, whose goods are its porter