केजी ते दुसरी ऑनलाईन शिक्षण; नववीपासून बारावीपर्यंत चार तासिकांची शाळा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

यापूर्वी केजी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षणातून वगळण्यात आले होते, आता या विद्यार्थ्यांना दरदिवशी अर्धा ते एक तास शिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मुंबई - राज्यातील अनेक पालकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्‍यक साधने उपलब्ध नसतानाही शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाचा अट्टहास कायम ठेवला आहे. यापूर्वी केजी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षणातून वगळण्यात आले होते, आता या विद्यार्थ्यांना दरदिवशी अर्धा ते एक तास शिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने राज्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत; तर अनेक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला; मात्र शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून झाले आहे. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवला आहे. ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असतानाही शाळा पालकांकडून दरवर्षीप्रमाणे शुल्क आकारत आहेत. याला पालकांकडून विरोध होत असतानाही यावर अद्याप शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शिक्षण विभागाने पहिली-दुसरीचे ऑनलाइन वर्ग घेऊ नयेत, असे स्पष्ट केल्यानंतरही शाळा सरकारचे आदेश धाब्यावर बसवत वर्ग भरवत आहेत. यासाठी पालकांकडून शुल्काची मागणीही होत आहे. यातच शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार यापुढे केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पालकांशीही साधणार संवाद 
केजीच्या विद्यार्थांचे दररोज ३० मिनिटे वर्ग घेण्यात येणार आहेत. यामध्ये पालकांशी संवाद, मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पहिली ते दुसरीची ३० मिनिटांची दोन सत्रे होणार आहेत. यामध्ये पालकांशी संवाद, प्रत्यक्षिकावर आधारीत शिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे; तर तिसरी ते आठवीच्या विद्यार्थांची ४५ मिनिटांची दोन सत्रे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नववी ते बारावीची ४५ मिनिटांची चार सत्रे ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department of Education decided to provide 1 hour education from KG to 2nd class